संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेय. पोलीस विभाग, वैद्यकीय विभाग आणि सामान्य प्रशासन यांनी आपापल्या परीने जिवाची पर्वा न करता लढा दिला. त्यामध्ये काही योध्दे शहीदही झाले. ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवून काही जिल्हे कोरोना मुक्तही झाले, परंतु मोठ्या शहराच्या ठिकाणी लोकांची गर्दी व लोकवस्तीची दाटीवाटी यामुळे लाॅकडाऊन करून सुद्धा कोरोनाचा प्रवास थांबला नाही. आता तो घराघरात पोहोचायला लागलेला आहे, त्यामुळे लोकांच्या मनात मरणाची भीती व रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे लोकं आपआपल्या गावाकडे स्थलांतरीत होऊ लागली. प्रवासाची साधने बंद असल्याने लोकं मुलाबाळांसह गावाच्या दिशेने चालू लागली. भारत पाकिस्तान फाळणी सारखे दृश्य दिसायला लागले.

शहरातून आलेल्या लोकांमुळे प्रशासनासह ग्रामीण भागातील लोकंही धास्तावली. त्यातच काही विघ्नसंतोषी लोकं शहरातील लोकांना येण्यास प्रतिबंध करीत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर रंगून पसरू लागल्या. त्यामुळे गावातील संबंध बिघडायला लागले. आधीच अति ताणामुळे कोलमडलेल्या पोलीस यंत्रणेवर अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवता भागवता भांडणे सोडवून कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम वाढले, म्हणून ठरवलं अगोदरच गावागावात जाऊन प्रबोधन करून तंटे होऊ द्यायचे नाहीत.

आधीच वणवण करून आलेल्या लोकांची स्वतंत्र निवाऱ्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था व्हावी यासाठी ग्रामस्तरावरील प्रशासन निर्माण करणे आवश्यक वाटू लागले. म्हणून गाव गाव फिरणे सुरू केलं. सुरुवातीच्या लॉकडाऊन पासूनच पोलीस स्टेशनला पोलीस मित्रांची टीम तयार केली होती. त्यांनी खूप चांगले काम केले होते. एवढ्याच अनुभवावर गावा गावात टीम तयार करायच्या ठरवल्या.

मागच्या दोन महिन्यापासून लॉकडाऊनचे ट्रेनिंग घेतलेल्या गावातील लोकांना व ग्राम कृती दलाला शहरातून आलेल्या लोकांची कशी व्यवस्था करायची, त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे, वाद विवाद कसे मिटवायचे, अचानक उद्भवलेल्या प्रश्नांची सोल्युशन कसे काढायचे, प्रशासनाने केलेला आदेशाप्रमाणे कोणते नियम बनवायचे व या लोकांच्यावर प्रेम, बंधुता, कर्तव्य, सहानुभूती, सहृदयता, दया याचा वर्षाव करून त्यांना कसे सुरक्षित ठेवता येईल याचे धडे देण्यास सुरुवात केली.

चीन देशातून भारतात व मोठ्या शहरातून आपल्या घराच्या उंबऱ्यापर्यंत कोरोनाचा प्रवास झाला आहे. आता फक्त आणि फक्त गावातील लोकच या कोरोनाला रोखू शकतात. गावकऱ्यांनी मुंबई पुण्यातून आलेले लोकांना आपलेसे करून त्यांना प्रेम देवून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत केली. क्वारंटाईनच्या 28 दिवसांमध्ये त्यांना काय हवे, काय नको हे पाहिले आणि प्रसंगी सण-उत्सव बाजूला ठेवून आर्थिक मदतही केली.

सर्व वादाचे प्रसंग संयमाने हाताळले व कोणत्याही परिस्थितीत क्वारंटाईन लोकांना घरातच अलगीकरणात ठेवले. त्यांचा कोणाशी संपर्क होऊ दिला नाही. असाच सर्व रत्नागिरीकरांचा प्रतिसाद राहीला तर थोड्याच दिवसात आपण या संकटातून सहिसलामत बाहेर पडू असा विश्वास सर्वांमध्ये जागृत झाला आहे.

लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. प्रशासनावर कोणताही ताण न आणता सर्व प्रश्नावर सोल्युशन काढून शांततेत कोरोनाची लढाई सुरू ठेवली आहे. गावातील एकाही स्थानिक व्यक्तीला बाधा होणार नाही असे ध्येय बाळगून जय जवान जय किसान चा नारा देऊन कोरोना सोबत लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. मागच्या काही दिवसात किरकोळ तक्रारींचे फोन येत होते. तक्रारींचे निरसन करण्यासाठी गावो गावी फिरत असताना ग्राम कृती दल व ग्रामस्थांनी राबवलेलं अतिशय सुंदर प्रशासन पहायला मिळाले.

प्रत्येक गावागावात दोनशे ते तीनशे लोक आलेले आहेत व त्यांची स्वतंत्र व्यवस्था करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. तरीसुद्धा न डगमगता घरोघर फिरून अनेक प्रकारच्या प्रश्नांचे सोल्युशन काढून सर्व लोकांची उत्तम सोय केली. त्यांची ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय व गौरवास्पद आहे. काही गावातील सुजान लोकांनी कोणत्याही प्रशासनाची वाट न बघता लोकांना विश्वासात घेऊन स्वतः आपआपले नियम करून गावाची व्यवस्था मजबूत केली आहे. त्यामध्ये दाभोळ पोलीस ठाणे हद्दीतील पंचनदी हे गाव व त्या गावातील ग्राम कृती दल व ग्रामस्थ यांचे नियोजन पाहून तर मी अवाक झालो.

तेव्हा मला वाटायला लागले आमचे हे सिविल सोल्जर्स कोरोनाशी दोन हात करायला तयार झाले आहेत. आत्तापर्यंत सर्व लोकं पोलीस, डॉक्टर यांना सॅल्युट करत होते. परंतु आता मला या गावातील लोकांना सॅल्यूट करायला निश्चितच अभिमान वाटेल. लवकरच आपण सर्व या संकटातून बाहेर पडु. या सिव्हील सोल्जर्सना माझा मानाचा सॅल्यूट!

– दीपक कदम
पोलीस उपनिरीक्षक
दाभोळ पोलीस स्टेशन