सगळेच या विषयावर बोलत आहेत तर मीही जरा बोलतो. तुम्हाला यावर मत द्यावसं वाटलं तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आधी हजार अंक उलटे मोजा.

कारण वरवर स्फोटक वाटणारी विधानं खरं तर अजिबात स्फोटक नसतात हे सोशल मिडियाच्या काळात आपण विसरून गेलो आहोत.

‘मी जात मानत नाही’ हे विधान मला कळू शकतं पण “मी गुरुत्वाकर्षण मानत नाही”, “मी देश वगैरे सीमा मानत नाही” किंवा “मी रागसंगीत मानत नाही” या विधानांसारखीच त्याही विधानाची उपयुक्तता तशी शून्याच्या आसपासच आहे.

जात आहे. आणि त्यात intrinsically काही वाईट आहे असं मला वाटत नाही. आपण जातींमध्ये जो उच्च-नीच भेद करतो तो मात्र मला सपशेल चुकीचा वाटतो.

ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलो तर मी कुणापेक्षा उच्च आहे किंवा नीच आहे असं मला अजिबात वाटत नाही. शाळेत असताना माझा सगळ्यात जवळचा मित्र न्हावी समाजाचा असून तो अभ्यासातही माझ्यापेक्षा फार हुशार होता.

त्यामुळे जात हे कुठल्याही प्रकारची योग्यता मोजण्याचं माप नाही याची खात्री मला कधीच पटली आहे.

जात – किंवा आपण त्याला ज्ञाती म्हणू – हा समाज सुटसुटितपणे संघटित करण्याचा एक मार्ग आहे. मागे मला वाणी समाजाच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं.

त्यांच्या ज्ञातीतल्या परीक्षेत उत्तम गुण मिळालेल्या मुलांचा सत्कार माझ्या हाती करण्यात आला. माझ्या तेव्हा ध्यानात आलं की त्यांच्या समाजतल्या मुलांना कुटुंबाच्या पलीकडे जाऊन एक सशक्त सपोर्ट सिस्टम उभी राहिली. आपण भारतीय आहोत आणि plural identity ही काही आपल्याला नवीन नाही.

आपण आहोत, आपल्याबाहेर कुटुंब आहे, कुटुंबाच्या बाहेर नाती आहेत, नात्यांच्या बाहेर ज्ञाती आहे, त्याच्याबाहेर आपली भाषा आहे, आपला प्रांत आहे, आपला देश आहे, आपली पृथ्वी आहे, हे चराचर आहे, संपूर्ण विश्व आहे.

मी माझ्या कुटुंबाचा आहे म्हणून मी काही कमी दर्जाचा भारतीय नाही आणि भारतीय आहे म्हणून कमी दर्जाचा माणूस आहे असं नाही.

यात भानगड होते ती वर्चस्व आपल्या मनात मूळ धरू लागलं की. एकदा का आपण कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा मेट्रिक त्याज्ज्य ठरवला की आपल्याला दिसते ती विविधता – अनेक जातींमधली विविधता – विचारांची, राहणीमानाची, खाण्यापिण्याची. आणि विविधता ही श्रीमंती आहे! कुणी पोळी म्हणतं कुणी चपाती म्हणतं तेव्हा कुणाचं काही जात नाही उलट मराठी भाषा श्रीमंत होते.

कुणी करंजी खातं, कुणी कानोले खातं तेव्हा आपलं पाकशास्त्र समृद्ध होत असतं. कुणी पोवाडा गातं कुणी ओवी गातं, तेव्हा आपलं संगीत बहरत जातं.

एका घोळक्याच्या ओळखीचा दाखला देऊन उच्च-नीच करणं एका अर्थानं न्यूनगंडाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे “जात संपवायला हवी” असं म्हणणाऱ्या लोकांकडेही मी संशयानं पाहतो कारण त्यांच्या मनात एकच कुठलीतरी जात संपवायची असते.

शिवाय “मी जात मानत नाही” असं पुन्हा पुन्हा म्हणणारी माणसं प्रचंड जातीय आकसाने भरलेली आहेत असा मला अनुभव आहे.

पूर्वी महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात एक ‘जात पंचायत’ नावाचा स्तंभ येत असे. फार मजा यायची तो वाचायला. विविध जातींचा उगम कुठून झाला, त्यांच्या ज्ञातीत करत असलेल्या पदार्थांवर चर्चा व्हायची. काय वैविध्य आहे आपल्याकडे!

या सगळ्यामध्ये अनेक लोकांबरोबर जातीच्या आधारावर अन्याय झाला, अत्याचार झाला हे मला ठाऊकही आहे आणि पूर्णपणे मान्यही आहे. पण आता ज्ञान आणि विशेषतः तंत्रज्ञानाने सगळ्यांनाच एका समान पातळीवर आणून ठेवलं आहे.

आमच्याकडेही महानगरपालिकेतल्या एक बाई आल्या. मी नव्हतो पण माझ्या पत्नीने त्यांचं स्वागत केलं, त्यांना पाणी, चहा विचारलं. सर्वेक्षणाच्या पलीकडे जाऊन गप्पा मारल्या.

जी उत्तरं होती ती दिली आणि त्या बाई “या घरात काम चोख झालं” हे समाधान घेऊन बाहेर पडल्या. त्यांनी जात विचारली कारण तो त्यांचा धर्म (कर्तव्य या अर्थी) होता. माझ्या पत्नीने ती न विचारता योग्य तो पाहुणचार केला कारण तो तिचा धर्म होता.

एकदा का माणूस म्हणून तुम्ही समान आहात याची तुम्हाला अगदी खात्री असेल तर तुम्ही जात सांगितली काय अन् समोरच्या माणसाला ती विचारली काय – काही फरक पडत नाही.

टीप – पुन्हा एकदा आठवण. कुठलीही प्रतिक्रिया देण्याच्या आत हजार अंक उलटे मोजा. विचार करा की खरंच यातून तुम्हाला काही साध्य होणार आहे का तरच प्रतिक्रिया द्या. पण विशेषतः काही हिणकस लिहावंसं वाटलं तर लिहूच नका हे उत्तम!

– कौशल इनामदार, संगीतकार