सोनू निगम हा ट्रान्सफॉर्मेशनच्या पिढीतल्या लोकांचा गायक आहे . ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या लोकांनी सानू -उदितला आयुष्यभरासाठी बोकांडी चढवून घेतलं आहे . २००० नंतरच्या पिढीला केके -शान आहेत. मी मागे शाहिद कपूरला सँडविच ऍक्टर असं नाव दिलं होतं.

सोनू निगम हा असाच सॅन्डविच गायक आहे. पण कुठल्याही एका पिढीने त्याला दत्तक घेतलं नसलं तरी तिन्ही पिढ्यांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे . म्हणजे कुणाचाच नाही पण सगळ्यांचाच आहे असलं विचित्र त्रांगडं .

पण मासेसशी (म्हणजे मोठ्या शहरातल्या , ग्रामीण निमशहरी भागात ,पिटातल्या प्रेक्षकांशी ) कनेक्ट असणारा तो शेवटचा गायक असावा. असा गायक की एखादं गाणं ऐकलं की पब्लिक उत्स्फूर्तपणे म्हणतं ,अरे हे तर सोनूचं गाणं . असं गायकाच्या नावावरून गाणं ओळखलं जातं असा हा शेवटचा गायक.

वर्ग , जात , धर्म , प्रांत यांच्या भीती भेदून सर्वत्र पोहोंचलेला शेवटचा गायक. ट्रान्सफॉर्मेशनमधला गायक असल्यामुळे कॅसेट रेकॉर्ड करून घेतलेल्या पिढीने पण सोनूच्या आवाजातली गाणी भरून घेतली आहेत आणि स्पॉटिफाय पिढीने पण सोनूची प्लेलिस्ट बनवली आहे. हे भाग्य केके, शान, मोहित चौहान, अरिजित यांच्या नशिबी नाही.

सोनू निगमच्या आवाजात एक जुन्या जगातलं दुःख आहे . ते काही पिढयांना हातातून निसटू द्यायचं नाहीये . ते दुःख चिरंतन आहे . पण त्याच आवाजात एक नव्या जगाची पण झिंग आहे . ज्यात आशा आहे आणि पहिल्या प्रेमाचा आनंद पण . भारतीय मासेसला जिंकायचं असेल तर हिरोला ऍक्शन मुव्ही करणं गरजेचं असतं आणि गायकाला sad song म्हणणं आवश्यक असतं .

सोनूची सगळ्यात लोकप्रिय तीन गाणी हा नियम सिद्ध करतात . ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का ‘ हे गाणं ग्रामीण निमशहरी भागात वाजत नाही असा एकही दिवस जात नाही .

प्रेमभंगाचं ग्लोरिफिकेशन झालेल्या देशाच्या एका मोठ्या भागाने हे गाणं उराउरी कवटाळून ठेवलं आहे . ‘कल हो ना हो ‘ हे गाणं वरवर खूप जीवनविषयक तत्वज्ञान सांगत असलं तरी या गाण्याला उदासवाणी ,दुःखाची डूब आहेच .नायकाचा अटळ असणारा मृत्यू सावलीसारखा गाण्यावर आहे .

तिसरं म्हणजे नवीन ‘अग्निपथ ‘ मधलं ‘अभी मुझमे कही मे ‘ हे गाणं .बहिणीला अनेक वर्षांनी भावाची ओळख पटली आहे आणि ती भावाला कडाडून मिठी मारते .या पार्श्वभूमीवर ‘कुछ एसी लगन ,इस लम्हे मे है ,ये लम्हा कहा था मेरा ‘ अशी आर्त साद सोनूचा आवाज घालतो तेंव्हा मनात सल बाळगणारा माणूस विदीर्ण होतोच . मग सोनूची असंख्य हिट गाणी आहेत .पण ही तीन गाणी म्हणजे कमाल .तिन्ही sad songs .

सोनू हा एकमेव असा गायक असेल जो जवळपास अस्तंगत इंडी पॉप मध्ये पण मोठा स्टार होता आणि फिल्म म्युझिकमध्ये पण . त्याचबरोबर तो खऱ्या अर्थाने पॅन इंडियन गायक पण आहे .जवळपास प्रत्येक भाषेत उत्तम हिट गाणी त्याने दिली आहेत .त्याचबरोबर गायक हा शो मन असतो ही जाणीव रुजवण्यात सोनूचा मोठा वाटा आहे .

देखणं रूप , मुख्य म्हणजे देखण्या रूपाची असलेली जाणीव , शारीर भाषा , आत्मविश्वास हे सोनूला परफेक्ट कॉम्बिनेशन बनवतं .भारतासारख्या देशात रॉकस्टार का बनत नाहीत अशी खंत एकदा रहमानने व्यक्त केली होती . सोनू हा आपला रॉकस्टार बनू शकला असता . तो तसा का बनला नाही याची कारणमीमांसा पुन्हा कधी तरी .

पुराणकाळात राक्षस किंवा एखादा ऋषी खूप कठोर तपस्या करायचा .मग देव प्रसन्न होऊन त्याला वर द्यायचा . मग त्या वरामुळे राक्षस /ऋषी भयानक उन्मत्त व्हायचा आणि लोकांना त्रास द्यायला लागायचा .

मग ज्या देवाने वर दिलाय तोच अवतार घ्यायचा आणि त्याला संपवायचा .तुमचा निर्मिकच तुम्हाला नष्ट करू शकतो . सोनूला पण टी सिरीजनेच निर्माण केलं आणि त्यांनीच सोनूला संपवलं . ही सोनूच्या आयुष्यातली फिल्मी /पुराणकालीन ट्रॅजेडी .

सोनूच्या आवडत्या गाण्यांची यादी वगैरे हे ‘सोनू निगम फेनॉमेना ‘ चं फारच सिम्पलीफिकेशन होईल .पण जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो आणि ‘संदेसे आते है ‘ ही सोनूची गाणी कोपऱ्या कोपऱ्यावर वाजत असतानाच त्याला ‘पद्म ‘ पुरस्कार जाहीर होणं हा या अतिशय आवडत्या गायकाच्या आयुष्यातला अजून एक फिल्मी योगायोग . सोनूचं अभिनंदन करण्यासाठी आमचं हे वरातीमागून घोडं .

– अमोल उदगीरकर