खेड – शिंदेगटाचे आमदार योगेश कदम यांनी मी शिवसैनिक असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे. शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी आज निशाणा साधला. सत्तांतर नाट्यानंतर ते पहिल्यांदा मतदारसंघात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

आता अलीकडेच राज्यात एकनाथ शिंदे यांचा बंड झालं आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला एक मोठा गट शिंदेंसोबत गेला आणि राज्यात नवं सरकार उदयाला आलं. शिंदेंसोबत गेलेल्या या गटात आमदार योगेश कदम हेही होते.

आ. योगेश कदम यांनी अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवत होते, असा थेट आरोप योगेश कदम यांनी केलाय.

मी गुवाहाटीला पळून गेलेलो नव्हतो. मी तिथं जातोय याची कल्पना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना दिली होती. पालकमंत्री अनिल परब हे माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेनेला संपवत होते, या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

मी एकनाथ शिंदे गटात सामील होताना शिवसेना नेते रामदास कदम यांना देखील सांगितलं होतं. तिथे गेल्यानंतर देखील मी वडील या नात्याने रामदास कदम यांच्या संपर्कात होतो, असे योगेश कदम म्हणाले आहेत.

रामदास कदम या साऱ्या राजकीय घडामोडीत मला सल्ले देत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर माझ्यासह अनेक आमदार पुढचे चार-पाच दिवस झोपलेले नाहीत.

अनिल परब माझ्या मतदारसंघात मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करत होते, असा आरोप करत ते माझ्याबरोबर शिवसेनाही संपवायला निघाले होते.

शिंदेगटात सामिल होण्याचं खापर योगेश कदम यांनी अनिल परब यांच्यावर फोडलं आहे.