दापोली : सायकलचा ब्रेक फेल होऊन झालेल्या आपघातात घाव वर्मी बसल्यानं लोकमान्य हायस्कूलच्या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन विनोद गौरतच्या अशा जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दापोली शहराला लागून असलेल्या गिम्हवणे (आझादवाडी) गावचा आर्यन शहरातील काळकाईकोंड येथील लोकमान्य हायस्कूलमध्ये दहावीत शिकायला होता. मुलगा अतीशय हुशार असल्यानं त्याच्या पालकांनी त्याला सेमी इंग्लिशमध्ये घातलं.

घरापासून शाळा दोन अडीच किलोमीटरवर असल्यानं तो सायकलनं ये जा करत होता. काळकाई कोंडाचा उतार तीव्र असल्यानं मुलं मागच्या रस्त्यानं घरी जात. गुरूवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे सायकल घेऊन शाळेच्या मागच्या रस्त्यानं निघाला.

आर्यन गौरत

शाळेपासून केवळ 200 मीटरवर त्याच्या सायकलचा अपघात झाला आणि घाव वर्मी बसला. त्याच्यासोबत शाळेतील मित्रमंडळी देखील होती. त्यांनी त्याला जखमी अवस्थेत तात्काळ शाळेत आणलं. शिक्षकांनी अपघताचं गांभीर्य ओळखून त्याला उपचारासाठी जवळच असलेल्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर डॉक्टरांनी तातडीनं उपचार करायला सुरूवात केली. पण उपचार सुरू असतानाच सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

हाताशी आलेला मुलगा आई वडिलांनी गमावल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी अतिशय शोकाकूल वातावरणात आर्यनवर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असे कुटुंब आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शाळेतील शिक्षकांना आर्यनच्या अशा अचानक जाण्यानं धक्का बसला आहे. त्याचे वर्ग शिक्षण अरविंद वानखेडे सांगत होते की,

आर्यन हा अतिशय हुशार, शांत स्वभावाचा मुलगा होता. अभ्यासा व्यतीरिक्त त्याला कशातच रस नव्हता. तो कष्टाळू होता. प्रेमळ होता. शाळेत त्यानं कधीही मस्ती केली नाही. त्याच्याबाबतीत असं होणं हे आम्हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे. परमेश्वर त्याच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचं बळ देवो, हीच प्रार्थना.