दापोली : उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याप्रकरणी दापोली नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते रवींद्र क्षीरसागर व राष्ट्रवादीच्या नगसेविका साधना बोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोलीतील वसिम मुकादम यांनी 18 ऑगस्ट रोजी तिघाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दापोली नगर पंचायतीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रवींद्र क्षीरसागर, खालीद रखांगे व सौ. साधना बोत्रे यांनी प्रतिज्ञापत्रे नामनिर्देशन सोबत सादर केली आहेत. या प्रतिज्ञापत्रामध्ये क्षीरसागर यांनी 40 मालमत्ता दर्शवल्या आहेत. सर्व पोटहिस्से धरुन 442 मालमता आहेत. खालीद यांनी स्वतच्या नावे असलेल्या 29 मालमत्तांपैकी 9 मालमता दुबार दाखवल्या आहेत व 6 मालमता अन्य व्यक्तीच्या नावावर आहेत. तसेच 3 मालमतांचे नंबर दापोली तालुक्यातील नाहीत. स्वत:च्या 11 व पत्नीच्या 7 अशा एकूण 18 मालमत्ता प्रतिज्ञापत्रामध्ये दर्शवण्यात आल्या आहेत. सौ. साधना बोत्रे यांनी 16 मालमत्ता दर्शवल्या असून सर्व पोटहिस्से धरुन 47 मालमत्ता आहेत. या तिघांच्या मालमत्तांचे अहवाल जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडून मागवले होते. 3 अधिकाऱ्यांच्या प्राप्त तीनही अहवालानुसार वेगळीच माहिती पुढे आली आहे.

प्रत्यक्षात क्षीरसागर यांच्या तालुक्यात 554 मालमत्ता असून त्यांनी प्रतिज्ञापत्रात केवळ 442 मालमत्ता दाखवल्या आहेत. खालीद रखांगे यांच्या दापोली तालुक्यात 113 मालमत्ता असून प्रतिज्ञापत्रात केवळ 18 मालमत्ता दाखवल्या आहेत. सौ. बोत्रे यांच्या तालुक्यात 194 मालमत्ता असून त्यांनी प्रतिज्ञापत्रात केवळ 48 मालमत्ता दाखवल्या आहेत. यामुळे या तीनही नगरसेवकांनी खोटी माहिती दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

उमेदवाराने शपथपत्रात, घोषणापत्रात हेतूपुरस्सरित्या चुकीची दिली असल्याबाबत या अहवालानुसार खात्री करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार रवींद्र क्षीरसागर, खालिद रखांगे व सौ. बोत्रे यांच्या विरुद्ध भादवी कलम 171 जी, कलम 177 व कलम 181 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दापोली नगर पंचायतीला दिले होते. यानुसार नगर पंचायतीचे अधिकारी अजित जाधव यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.