▪ जे . डी . पराडकर

jdparadkar@gmail.com

9890086086


कोकणात मंदिरांंची काही कमी नाही . निसर्गसंपन्न कोकण भागात चालुक्य राजवटीत सर्वाधिक मंदिरे उभारली गेली . चालुक्य राजे शिवाचे उपासक असल्याने त्यांनी उभारलेली मंदिरे ही अर्थातच शिवाचीच आहेत . ज्या भागात जो पाषाण उपलब्ध होइल , त्या पाषाणामध्ये ही शिवमंदिरे उभारली गेली . या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य शास्त्रा बरोबरच त्यातील अलौकिक कोरीवकाम अचंबित करणारे ठरते . संगमेश्वर तालुक्यामधील कसबा गावात चालुक्यकालीन शिवमंदिरे त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राचा अद्भूत आविष्कार दाखवत आजही उभी आहेत . मंदिर अथवा परिसरातील शिल्पांमध्ये दाखवण्यात आलेले प्रसंग पाहिले की , थक्क व्हायला होते . एक एक शिल्प म्हणजे , अर्थाची उकल झाल्यानंतर प्रबंध लिहावा अशी आहेत . देश विदेशातील शिल्प अभ्यासकांनाही आश्चर्य वाटावे अशी ही शिल्पकला म्हणजे या परिसराचे भूषणच म्हटले पाहिजे . शिल्प , स्तंभ , विरगळ अशा अनेक शिल्पाकृती या परिसरात असून पर्यटन दृष्टीने या भागाचा अपेक्षित विकास होवू शकला नाही . येथील शिव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अभिषेक करत असत , असा इतिहास आहे . या शिव मंदिरांव्यतिरिक्त नजीकच्या कळंबस्ते गावांत ‘ रामेश्वर पंचायतन ‘ मंदिर आहे . आजही फारसे कोणाला माहित नसलेले हे मंदिर म्हणजे अत्यंत पवित्र असे ठिकाण असून येथील शिवलिंग आणि मूर्ती पाहिल्यानंतर जाणकाराला त्यातील तेज आणि वेगळेपण नक्कीच दिसून येइल . ‘ पंचायतन ‘ म्हणजे पाच देवांचे एकत्रित ठिकाण . पंचायतन हे सर्रास सर्वत्र आढळत नाही . काही भक्तांच्या घरी देव्हाऱ्यात पंचायतन असते . कळंबस्ते येथे तर साक्षात पंचायतनचे मंदिर आहे . प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी आणि नतमस्तक व्हावे असे हे ठिकाण सर्वांगसुंदर बनवण्यात मोठा वाटा आहे , तो येथील स्थानिक ग्रामस्थांचा .

जिद्द आणि चिकाटी अंगी असली की , अशक्य ते शक्य करता येतं . हे दाखवून दिलंय ते कळंबस्ते साटलेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी . रामेश्वर पंचायतन मंदिर परिसर म्हणजे भग्नावस्थेत असलेले घुमट आणि अधिक दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही क्षणी कोसळतील अशा मुख्य मंदिराच्या आवारातील चार छोटी मंदिरे . सभामंडप कोसळलेला आणि त्याच स्थितीत अनेक वर्षे जागेवरच असलेल्या स्थितीत . मंदिरात जायचे म्हणजे सर्वत्र वेली आणि जाळ्यांनी वेढलेले असल्याने वाट काढतच जायचे . सर्व घुमटांवर मोठी झुडपे तयार होवून त्यांचा विस्तार झालेला . सारं दृष्य म्हणजे लवकरच पंचायतन परिसर भग्न होणार अशा स्वरुपाचे . फणसवणे येथील आमचे पत्रकार मित्र सत्यवान विचारे यांनी या मंदिराची महती एक दिवशी कथन केली आणि यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा आग्रह देखील धरला . एक दिवस ठरवून पत्रकार सत्यवान विचारे , पत्रकार दीपक भोसले यांच्या सोबत आम्ही कळंबस्ते साटलेवाडीत पोहचलो . जातांना नारळ उदबत्ती घ्यायला विसरलो नाही . साटलेवाडीत गेल्यानंतर मंदिराच्या पूजाऱ्यांना घेऊन आम्ही मंदिर परिसरात पोहचलो , तर समोरील भग्नावस्था आणि वेली – जाळ्या पाहून मन हेलावले . असामान्य महत्व असणाऱ्या या ठिकाणाची अशी अवस्था का बरं झाली असेल ? असा पहिला प्रश्न पडला .

सभामंडपाच्या पायऱ्या चढून आम्ही वर आलो , तर काय मोडलेल्या सभामंडपात सर्वत्र वेली , जाळ्या आणि झुडपं वाढलेली . अशा स्थितीत एका अलंकृत आणि रुबाबदार नंदिने आमचे लक्ष वेधले . पत्रकारीता करतांना काहीतरी वेगळं वाचायला द्यायचे या उद्देशाने मी रत्नागिरी जिल्हा फिरलोय , मात्र पंचायतन मंदिराच्या सभामंडपात असणारा नंदि मी अन्यत्र कोठेही पाहिलेला नाही . अलंकृत असणारा हा नंदि एका बाजूला रेलल्यासारखा भासतो . नंदिवर एवढे बारीक अलंकरण केलेले मी प्रथमच पहात होतो . त्याचा आकारही तुलनेत भव्य असल्याचे जाणवले . आता गाभाऱ्यात जाण्यासाठी आम्ही पाऊल घातले खरे , मात्र आमची चाहूल लागताच शेकडो वटवाघळे बाहेर पडू लागली . आत जावून पाहिले , तर तेवढीच वटवाघळे मंदिराच्या घुमटाला लटकत होती . गाभाऱ्यात सर्वत्र कुबट वास येत होता . तेवढ्यात नजर गेली ती , येथील शिवलिंगावर . अचानक काय घडलं माहित नाही , या शिवलिंगाची लकाकी माझ्या डोळ्यात भरली . या प्रसंगातून योग्य ते अंजन माझ्या नेत्रात पडले होते . अशा प्रकारचे शिवलिंग मी प्रथमच पहात होतो . शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे संगमरवरातील अष्टदुर्गेची मूर्ती विराजमान आहे . एवढी सुबक मूर्ती मी प्रथमच पहात असल्याने काही केल्या या मूर्तीवरुन नजर हटत नव्हती . एवढ्यातच मंदिराचे पूजारी चला बाहेरची छोटी मंदिरे पाहूया ! असे म्हणाले आणि मन भानावर आले . बाहेर जाण्यापूर्वी सोबत आणलेले श्रीफळ भगवान शंकरासमोर ठेवून आम्ही लवकरात लवकर या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून आणि त्यामध्ये आमच्या हातून काही सेवा घडावी म्हणून प्रार्थना केली .

जांभ्या दगडात उभारण्यात आलेले हे मंदिर भग्न स्थितीत आणि वेली – जाळ्या वाढलेल्या असतांनाही रेखीव असल्याचे भासत होते . मंदिराला असणारी तटबंदी एका रेषेत आणि मजबूत असल्याचे दिसत होते . मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला उंच दीपमाळा आहेत . मध्यभागी शिवमंदिर आणि चार कोपऱ्यात गणपती , अष्टदूर्गा , सुर्यनारायण आणि विष्णूच्या मूर्ती असणारी छोटी मंदिरे असे मिळून रामेश्वर पंचायतन तयार झाले आहे . येथील गणपती उजव्या सोंडेचा आहे . विशेष म्हणजे चार कोपऱ्यात असणाऱ्या देवतांच्या मूर्ती आकाराने सारख्याच आहेत . याबरोबरच मंदिरांची उंची देखील एकसारखीच आहे . या मंदिरांवरही वेली आणि जाळ्या वाढलेल्या होत्या . पंचायतनातील सर्व मूर्ती या अप्रतिम संगमरवरात कोरलेल्या असल्याने त्यांचे एक वेगळेच तेज जाणवत होते . अशा प्रकारचे पवित्र ठिकाण जवळपास नसल्याने आपण काहीतरी प्रयत्न करायचे असा मंदिराच्या प्रांगणात परत एकदा चंग बांधला . मंदिराच्या मागे एक सुंदर तळी असून तीचे देखील चारही बाजूने जांभ्या दगडात बांधकाम केलेले आहे . एकूणच सारा परिसर अनन्यसाधारण असल्याने याचा जीर्णोद्धार होण्याच्या दृष्टीने आपली लेखणी उपयुक्त ठरली पाहिजे याची मनाशी खूणगाठ बांधली आणि परत एकदा मनोमन नतमस्तक झालो .

प्रथम मंदिर उभारणीचा इतिहास जाणून घेणं महत्वाचे होते . इतिहास जाणतांना जी माहिती मिळाली , ती मोठी रंजक होती . कळंबस्ते येथील एक गानू नामक व्यक्ती मध्यप्रदेशला अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती . अहिल्याबाई या शिवभक्त असल्याने त्यांनी काही शिवधन या गानूंच्या हाती सोपवून त्यांच्या गावात शिवमंदिर उभारायला सांगितले . त्यानुसार या मंदिराची उभारणी झाली . मंदिरात असणाऱ्या सर्व मूर्ती या त्याकाळात घोड्यावरुन कळंबस्ते येथे आणण्यात आल्या . एवढा जबरदस्त आणि ताकदवान इतिहास या मंदिरामागे असल्याने जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा याबाबत एक नवी उर्जा मिळाली . एकतर पंचायतनचे पवित्र ठिकाण परिसरात जवळपास नाही आणि दुसरे म्हणजे अप्रतिम कोरीवकाम आणि लकाकी असलेल्या मूर्ती . मंदिराजवळ निगडित काही मंडळींजवळ संपर्क केला . त्यांच्या सोबत बैठकाही पार पडल्या . याबाबत वृत्तपत्रातून सविस्तर लेखनही केले . मंदिराचे महत्व ओळखून देश विदेशातून मदत देण्यासाठी इच्छूक असल्याचे फोन आले . मात्र यासाठी आवश्यक असणारा पुढाकार घ्यायचा कोणी ? या प्रश्नावरुन जीर्णोध्दार कामाला काही गती येत नव्हती .

अखेरीस कळंबस्ते साटलेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ , मुंबईकर मंडळी , गानू मंडळी यांनी एक बैठक घेऊन मंदिर जीर्णोध्दार करण्याचा जणू चंगच बांधला . वाडीतील प्रत्येक घरामागे वर्गणी काढून , प्रत्यक्ष मंदिर जीर्णोध्दार कामाला सुरुवात झाली . विशेष म्हणजे साटलेवाडीतील माहेरवाशीणी , वाडीतील ग्रामस्थांचे नातेवाईक आणि विशेष म्हणजे मुंबईकर कार्यकर्ते यांनी जणू चंग बांधला आणि वर्षभरातच मंदिर परिसराला नजर लागेल असा जीर्णोध्दार करुन दाखवला . या मंदिराला जी नवी झळाळी मिळाली आणि आणखी एक पवित्र वास्तू जमिनदोस्त होण्यापासून वाचवली , ती साटलेवाडीतील ग्रामस्थांच्या एकजुटीनेच . या शिवमंदिरात आता महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होवू लागलाय . जीर्णोध्दार करतांना हाती फारसा निधी नसतांना कोठेही काटकसर केली नाही हे निश्चितच कौतूकास्पद म्हटले पाहिजे . केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे ही म्हण साटलेवाडीतील ग्रामस्थांनी सत्यात उतरवून दाखवली . पत्रकार म्हणून आम्ही केवळ निमित्तमात्र होतो . पंचायतनाचे हे ठिकाण खूप स्थानमाहात्म्य असणारे आहे . याबरोबरच येथे पोहचल्यानंतर वातावरणातील पावित्र्यही जाणकारांना सहज लक्षात येते . ज्यांना शक्य आहे त्यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर आवर्जून या मंदिराला भेट द्यावी . संगमेश्वर ते कसबा येथून पुढे फणसवणे येथे गेल्यानंतर डावीकडील पूलाकडे न जाता सरळ उमरे मार्गावर जायचे . तेथून कळंबस्ते हायस्कूल जवळून पुढे गेल्यानंतर एक छोटा पूल लागतो त्याच्या पुढे उजव्या हाताला वळल्यानंतर तो रस्ता साटलेवाडी येथील रामेश्वर पंचायतन मंदिराकडे जातो . रस्त्यावरुन थोडेसे अंतर चालावे लागते . मात्र कोणाला त्रास होवू नये म्हणून ग्रामस्थांनी छान पायवाट बांधली आहे . छायाचित्र पाहिल्यानंतर जिल्ह्यातील भाविक तर नक्कीच या मंदिरात जातील , पण कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांनीही पंचायतन मंदिर पहावे आणि शक्य झाल्यास बाजूच्या उर्वरित मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी यथाशक्ती देणगी द्यावी आणि हा पूरातन ठेवा जपण्याच्या कामातील एक साक्षीदार बनण्याचा आनंद घ्यावा.