गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री राजीव सातवना राजकोट पोलिसानी दमदाटी केली. रात्री एक वाजताची वगैरे गोष्ट. कुठूनतरी समजलं. आदल्याच रात्री आम्ही राजकोटमध्ये भेटलो होतो, गप्पा गोष्टी केलेल्या. तेव्हा त्यांच्या सोबत जालन्याचे राजेंद्र राख होते. सातवांना फोन केला तर लागला नाही, मग राखला केला. राजकोटमधल्या दोन पत्रकार मित्रांना केला. आणि मग रात्री ट्विट केलं. अडीच वाजता वगैरे. सकाळी सहा वाजता सातवांचा फोन. मी गंमतीने विचारलं, काय भरपूर मारलं का पोलिसानी? तर हसले. म्हणाले, “पोलिसांचं सोडा, रात्री अडीच वाजता या मित्राची तुम्हांला काळजी वाटली एवढ्या एकाच गोष्टीने मी खुश आहे.”

हा असा माणूस! तीन तासांपूर्वी तो पोलीस स्टेशनमध्ये होता. पण बाहेर आला आणि पुन्हा नेहमीसारखा हसत कामाला लागला.

ह्या अश्या माणसाला इतक्या लवकर आपल्याला सोडून जायचा अधिकार आहे काय? जिंदगी आत्ता तर कुठे सुरू झाली होती. अजून खूप काही करायचं, बघायचं होतं. पण,…

सातव नसणं ही कल्पनाच नाही करू शकत. ही माझी वैयक्तिक हानी आहे. खूप मोठी हानी. दिवसाच्या २४ तासांतली अशी कोणतीही वेळ शिल्लक नव्हती ज्या वेळी आम्ही एकमेकांना कॉल केले नव्हते. हा माणूस राजकारण सोडून अनेक गोष्टी बोलायचा. पिक्चर, पुस्तकं, समाजकारण, तंत्रज्ञान, सर्व काही.

एखादं पुस्तक सुचवलं किंवा वाचलं तर सातव फोन करायचे. कितीही वाजता. म्हणजे रात्री एक वाजता फोन करून, “तुम्ही जी अमुक अमुक घटना सांगितली होती त्याबद्दल ह्या ठिकाणी हे असं असं लिहिलंय हे सांगायला फोन केला.” काँग्रेसमधले वाद, राहुल गांधींची भूमिका, काँग्रेसचे प्रश्न वगैरे गोष्टी सातव अत्यंत श्रद्धाळूपणे बोलत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐकत. कितीही कठोर शब्द वापरले तरी ऐकत.

जेव्हा सातव युवक चे महाराष्ट्र अध्यक्ष झाले तेव्हा आमची ओळख झाली. झाली १२/१४ वर्षं. नंतर ते दिल्लीला गेले आणि तिथे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. मग काही काळाने मीही दिल्लीला गेलो. आज जे श्रीनिवासचं ऑफिस आहे, युवक काँग्रेसचं, तिथे सातवांना नेहमी भेटणं होई. गप्पा होत. तेव्हा काँग्रेस सरकार होतं. खूप शिव्या घालायचो सरकारला. सातव शांतपणे ऐकत. त्यांचा मुद्दा मांडत. पण कधीही उर्मटपणे वागत नसत किंवा टीका केली म्हणून चिडत नसत.

नंतर ते खासदार झाले. २०१४ ला. किती लिहू? म्हणजे त्यांच्या त्या तिकीट मिळण्यापासून, ते तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी पवार साहेबांकडे जाऊन मागितलेली मदत ते निवडून येणं वगैरे वगैरे. इतक्या गोष्टी आठवतायत आता.

पण काय उपयोग? हा माणूस झेप घ्यायला निघाला होता. ह्याच्या डोळ्यांत स्वप्न होती. ह्याचा जीव होता महाराष्ट्रावर. कटाक्षाने चुकीच्या गोष्टी करत नव्हता. ह्या कोरोनाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला एक कायमची काळी किनार लावलेली आहे. राजीव हा त्यातला सर्वात गडद स्तर आहे.

एकदा काही कारणाने माझ्या बायकोची आणि त्यांची भेट झाली. बायकोला भेटल्या भेटल्या म्हणाले, “वहिनी मी अमेयजींना कधीही फोन करतो. तुम्हांला त्याचा त्रास होत असेल. मला क्षमा करा.” बायको म्हणाली, नाही नाही. मला आता सवय झालीय. तर हसले आणि म्हणाले, “हा, माझी बायको पण असंच म्हणते. जाऊ द्या. आमच्याकडे आता दुर्लक्ष करा.”

आठवड्यातून किमान दोन/तीन वेळा तरी फोन आणि महिन्यातून एकदा भेट हा साधारण २०१२ पासूनचा आमचा संपर्क आहे. हा त्या मोजक्या नेत्यांपैकी एक होता जो तुम्हांला भेटायला येई. कधीही तुम्ही कुठे याल हा प्रश्न सातवांनी विचारला नाही. “कुठे येऊ?” हा प्रश्न असे आणि तसे ते येऊन भेटत. ही मान अपमानाची बाब नसते. ही सुसंस्कृता असते. ती या माणसात ठासून भरलेली होती. तुम्ही अनावश्यक तितके सभ्य आहात असं मी अनेकदा त्यांना म्हणे ते त्यासाठीच. आणि त्यावर त्यांचं उत्तर असे, “अमेयजी, मी राहुल गांधींचा कार्यकर्ता आहे.”

आज डोळ्यात पाणी आहे. सातवांच्या कुटुंबासारखेच असलेले त्यांचे सगळे सहकारी, दत्ता, गोसावी, विनोद, रजित आरोलकर सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. हे दुःख पेलण्याची ताकद त्यांना ईश्वर देवो. हे दुःख सर्वांचंच आहे. आमच्यासारख्या असंख्य मित्रांचं आहे. हे आता आयुष्यभराचं दुःख आहे.

अलविदा दोस्त! यानंतर रात्री अपरात्री तुमचे फोन येणार नाहीत. “बॉस एक मिनिट बोलू का?” अशी तुम्ही सुरुवात करणार नाही. आता तुम्ही नसल्याची अस्वस्थता कधीच संपणार नाही.