राजापूर : शिवसेनेचे उपनेते तथा आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजासह रत्नागिरीमध्येही अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दणदणीत यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे.

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने आपले वर्चस्व सिध्द करीत कोकण हा मुळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिध्द केले आहे. राजापूर तालुक्यात एकूण १० ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असुन त्याठिकाणी ८ ग्रामपंचायतीवर तर लांजा मध्ये १५ पैकी ९ ग्रामपंचायतीवर व रत्नागिरी मध्ये ४ पैकी  ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने भगवा फडकवला आहे.

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील दैदीप्यमान व अपेक्षित विजयानंतर येथील बहुतांशी विजयी सदस्यांनी आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून गावागावात झालेली विकासकामे व शिवसैनिकांची अपार मेहनत यामुळे आपण हा विजय साकार शकल्याचे सांगितले.

तर सर्वेसर्वा उपनेते तथा आमदार राजन साळवी यांनी हा अपेक्षित विजय मतदाराच्या विचाराचा, शिव सैनिकांचा असल्याचे सांगून तालुकाप्रमुख, सर्व उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख,उप विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, पं.स.सभापती,सदस्य,जि.प.सदस्य तसेच शिवसैनिकांच्या अपार मेहनतीमुळे मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली.

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी उपनेते तथा आमदार राजन साळवी यांचे दूरध्वनी द्वारे संपर्क करून मिळालेला यशाबद्दल अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.