ऋषी देसाई, सुप्रसिद्ध निवेदक

दशावतार… केवळ एक लोककला नाही तर कोकणी माणसाच्या जगण्याची अस्मिता आहे. ते दृश्य आठवणेच हीच मुळात एक गंमत आहे.

गाभाऱ्यात गर्दी असते, पण सभामंडपात मात्र केवळ एक बाकडा असतो… आणि मनातल्या मनात चित्र उभे राहते… बाजूच्या छोट्या मंदिरात काही लोक झोपलेली असतात… मंदिराच्या बाहेर त्यांची ती मेट्याडोर उभी असते… वरचा बोर्ड लक्ष वेधून घेतो… तेवढ्यात झपकन संध्याकाळ होते… खाजा- भजाची दुकाने लागतात… साखरेच्या गाठल्या, कोंबडे, मंदिर, तुळस सगळं नटून बसते…

ऋषि देसाई

ढोलावर काठी पडते. भरभर पावले घराकडे वळतात… पटकन जेवून झोप काढून रात्री परत अकरा वाजता धमकालो पहायचा असतो… दुपारी पाहिलेल्या मंदिराचा नूर बदललेला असतो… गाभाऱ्यात समईत देव उजळलेला असतो. खांबकाठी सजून रांगेत उभी असायची. देवळाच्या आजूबाजूचे पूर्वसाचे जागादेखील हार अगरबत्ती पेढ्यानी सजलेले असते…

लावूडस्पीकरवर हळू आवाजात अजित कडकडे यांचे’ तूर सूर ठावा मजसी’ सुरू असते… मंदिराच्या संपूर्ण छप्परावर रनिंग लाईट तोरण सगळं लखाखून टाकत असते… मंदिराच्या बाजूला ती दुकाने, भाविक या सगळ्यांचा वावर आपला स्वताचा रिदम सुरू असतो…

तोपर्यंत बाजूच्या छोट्या मंदिरात झोपलेले कलाकार जागे झालेलं असतात… स्त्री वेशातली कलाकार रंगून तयार असते… भगभगलेल्या गुलुपांच्या रांगा, उघडलेल्या ट्रांका, रंगत असलेले कलाकार, बाजूला बघ्यांची गर्दी… आणि हे सगळं पाहत असताना त्याच खोलीत मध्यावर असलेला पेटाऱ्यातला गणपती हे सगळं शांतपणे पाहत असतो…

समीर पंडितराव

दशावतार हा शब्दात मांडणे कठीण आहे… ज्यांनी तो प्रत्यक्ष पाहिलाय आणि दुसऱ्या दिवशी पेंगुळलेल्या नजरेने ते कानाने अनुभवलंय ना त्यांना विचारा दशावतार म्हणजे काय. चित्रपट बघून जास्तीत जास्त अर्धा तास तो प्रभाव राहू शकतो पण दशावतार पहिल्यापासून तो 72 तास नाद कानात घुमत राहतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक लोककलेत ती जादू आहे, पण दशावतारात ती काकणभर जास्त आहे…

आजच्या व्हर्च्युअल जगात तळीवल्या बाईला बाई समजून तिच्याशी हसणे, तळीत दीपदान टाकणे… किंवा नाटक सुरू असताना ऑनलाइन लव्ह इमोजी टाकणे, थम्ब करणे यासारखे मध्येच जो आपण रिस्पॉन्स देतो ना तो सगळा प्रकार दशावतारात असतो. कला आवडली की लगेच बक्षीस देतो… रंगलेल्या नाट्यप्रयोगातही तो कलावंत ते बक्षीस स्वीकारतो, आणि परत नाटक सुरू होतो… मला वाटतं, लिखित संवाद नसलेल्या या दशावतारी नाट्यप्रयोगातलं हे जे भूमिकेतून इन आऊट होणे आणि तरीही खेळ डिस्टर्ब न होणे हा जो सामूहिक प्रभाव आहे ना तो अभिनयमार्तंडानी समजून घ्यावा… मोबाईलची रिंग वाजली म्हणून चिडणे सोपे आहे, पण रंगलेल्या खेळात रसिकांचा मान राखणे बिदागी स्वीकारून हसणे हे खूप अवघड आहे.. दशावताराबद्दल बोलताना प्रत्येक पैलू त्याची महानता सिद्ध करत राहील, आपण सांगायला कमी पडू हे नक्की…