रत्नागिरी : शहरातून पावसाच्या दिशेने निघालेल्या एका दुचाकीस्वाराचा भाट्ये पुलावर चेकपोस्टजवळ भीषण अपघात झाला.

भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीस्वाराने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावर कोसळला.

या अपघातात महेश अनंत पिलणकर (वय ४८, रा. टाकळे वाडी, फणसोप, रत्नागिरी) याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास भाट्य पूल येथे घडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि त्यांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली.

अपघातामुळे भाट्ये पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

मात्र अपघात घडल्याची माहितीही ट्रक चालकाला नव्हती. ट्रक चालक काही अंतर गेल्यानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला थांबविले आहे.

या अपघातात महेश पिलणकर यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा चेहरा चेपला गेला असून ट्रक चालकाच्या हौद्याची जोरदार धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. महेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

या अपघातामधील मयत व्यक्ती ही फिनोलेक्स कंपनीत कामाला होती. ती आपल्या दुचाकीवरुन रत्नागिरीकडे येत असताना ट्रक चालक बाजू घेऊन जात असताना हा अपघात झाला असल्याचा चर्चा रुग्णालयात सुरु होती.

महेशच्या मृत्यूची माहिती मिळताच टाकळेवाडी-फणसोप येथील त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवार, नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे.

शहर पोलिस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

या घटनेमुळे टाकळेवाडी फणसोप गावात शोककळा पसरली आहे.