खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात रविवारी (दि. 23) तीन वाहनांचा भीषण अपघात झाला.

सिमेंटच्या बकलरने महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक आणि एर्टिगा कारला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर ट्रक सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळला, तर एर्टिगा कार दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली.

या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. गेल्या चार दिवसांतील हा चौथा अपघात असल्याने भोस्ते घाट धोकादायक बनला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटच्या बकलरने पुढे चाललेल्या एर्टिगा कारला जोरदार धडक दिली.

त्यानंतर घाटात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली.

धडकेनंतर ट्रक सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळला, तर एर्टिगा कार बकलरच्या धडकेने दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली.

या अपघातात एर्टिगा कारमधील पाच प्रवासी, तर सिमेंट बकलरमधील चालक आणि वाहक असे एकूण सात जण जखमी झाले आहेत.

दोन्ही वाहनांना धडक दिल्यानंतर सिमेंटचा बकलरही दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन अडकला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, मात्र नंतर ती धीम्या गतीने सुरू करण्यात आली.

सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे भोस्ते घाटातील धोकादायक वळणे आणि अपघातांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.