दापोली : समाजात जन्मत:च मोठी असणारी, मोठपण लादल्याने मोठी होणारी आणि स्वकर्तृत्वाने मोठी होणारी अशी तीन प्रकारची माणसे आढळतात. डॉ. मुराद महम्मद बुरोंडकर हे स्वकर्तृत्वाने मोठे झालेले व्यक्तिमत्व होय.
डॉ. मुराद बुरोंडकर यांचा जन्म दि. १३ ऑगस्ट १९६० रोजी झाला. त्यांचे वर्ग १ ते ७ पर्यंतचे शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या मुरूड येथील प्राथमिक उर्दू शाळेत, ८वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण दापोलीच्या नॅशनल उर्दू शाळेत तर ११वी ते १२वीचे शिक्षण खेड तालुक्याच्या फुरूस येथील कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यांनी कोकण कृषि विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह व एम.एस्सी. (कृषी) ही पदव्युत्तर पदवी वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विषयात पूर्ण केली. त्यानंतर आचार्य पदवी त्यांनी कर्नाटक राज्यातील कृषी विद्यापीठ, धारवाड येथून सुवर्ण पदकासह प्राप्त करून कोकणची शान वाढवली.

कोकण कृषी विद्यापीठाच्या दि. ४/११/१९८५ रोजी तात्पुरत्या स्वरूपात रूजू झाल्यावर व जवळपास सहा वर्षे काम केल्यावर त्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे ‘कनिष्ठ आंबा शरीरक्रिया शास्त्ज्ञ’ पदावर २२/०२/१९९० रोजी कायमस्वरूपी त्याच पदावर नियुक्ती मिळाली. त्या पदावर आठ वर्षे आंब्यावरील संशोधन व विस्ताराचे काम केल्यावर त्यांना दि. ६/०७/१९९८ रोजी ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदावर बढ़ती मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘कनिष्ठ आंबा शरीरक्रिया शास्त्रज्ञ’, ‘उपसंशोधन संचालक’ व तत्कालीन कुलगुरू डॉ. एस एस. मगर यांचे ‘तांत्रिक अधिकारी’ म्हणून जवळपास दोन वर्ष यशस्वीरीत्या कार्य केले. त्यानंतर दि. १७/१२/२००५ रोजी ‘सहयोगी प्राध्यापक पदावर बढती मिळाल्यावर तसेच ‘प्राध्यापक पदाचा अतिरिक्त पदभार जवळपास सहा वर्षे तसेच वनशास्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता हे अतिरिक्त पदही भूषवत ते दि. २८/०२/२०२१ पर्यंत अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावून खाजगी कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत आहेत.
डॉ. मुराद बुरोंडकर यांना ३० वर्षांपेक्षा अधिक आंवा पीक उत्पादन आणि काढणी पश्चात शरीरक्रियाशास्त्र व १५ वर्षांचा भात शरीरक्रियाशास्त्रामध्ये संशोधनाचा दांडगा अनुभव आहे. आंबा उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधीत नऊ शिफारसी व तीन संकरित जातींच्या निर्मितीमध्ये थेट संशोधक म्हणून त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
या शिफारसी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त संशोधन आढावा समितीने व्यावसायिक तत्वावर अवलंबन करण्यासाठी प्रमाणित व प्रसारित केल्या आहेत. आंब्याच्या एक वर्षाआड फळधारणेवर उपाय म्हणून भारतात पहिल्यांदाच सन १९८६ ते सन १९९२ या दरम्यान
पॅक्लोब्युटॉझॉलच्या उपयोगासंबधीचे संशोधन त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरले. त्यामुळे हापूस सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या झाडाला दरवर्षी लवकर मोहर येऊन आंब्याचे उत्पादन २ ते २.५ पटीने वाढले आहे. मागील २० वर्षापासून कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील आंबा उत्पादक दरवर्षी २० हजार लिटरपेक्षा जास्त पॅक्लोब्युट्रॉझॉलचा उपयोग जवळपास ७ ते १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी करतात.
पॅक्लोब्युट्रॉझॉल तंत्रज्ञान हे आंबा उत्पादनातील शाश्वततेसाठी अतिशय मोलाचे असून विद्यापीठाच्या एकात्मिक आंबा उत्पादन तंत्रज्ञानामध्ये या संजीवकाची भूमिका मध्यवर्ती व निर्णायक ठरली आहे. सन १९९२ मध्ये प्रसारित करण्यात आलेली ‘सिंधू’ ही पातळ कोय असलेली पहिली जात, ‘रत्ना’ आणि ‘सिंधू’ संकरातून विकसित करण्यात डॉ. बुरोंडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी ‘निलम’ व ‘हापूस’ याच्या संकरातून ‘कोकण रूची’ ही आंब्याच्या लोणच्यासाठी तसेच ‘हापूस – निलम’ याच्या संकरातून ‘सुवर्णा’ ही संकरित जात विकसित केली आहे. ‘सिंधू’ ही सघण लागवडीकरिता विकसित केली आहे. ‘सिंधू ही सघण लागवडीकरिता सुयोग्य असून यात नियमित व भरपूर फळधारणा होते. याची फळे मध्यम आकाराची, आकर्षक तांबडया रंगाची, साकामुक्त असून सुवासिक व चवदार आहेत.
आंब्याच्या जुन्या व खुप घनदाट होऊन सूर्यप्रकाशाअभावी उत्पादकतेत लक्षणीय घट झालेल्या बागांचे पुररूज्जीवन करण्यासाठीचे तंत्रज्ञान सन १९९८ मध्ये विकसित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली असून दुपटीपेक्षा जास्त उत्पादन मिळायला लागल्याने शेतकऱ्यांमध्ये हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले आहे.
परिणामत : राष्ट्रीय फळबाग योजनेमध्ये या तंत्रज्ञानाच्या अवलंबनासाठी विशेष अनुदानाची तरतूद आहे. एकाच हंगामात आंबा झाडाच्या शेंडयातून पुन्हा पुन्हा येणाऱ्या मोहरामुळे फळांची गळ थांबविण्यासाठी जिब्रीलीन्स’ या संजीवकाच्या ५० पीपीएम तीव्रतेच्या दोन फवारण्या हंगामाच्या पहिल्या मोहरावर करण्याची त्यांनी केलेली शिफारस जगमान्य झाली असून या विकृतीसंबंधीचा पहिला अहवाल जागतिक स्तरावर प्रकाशित झाला आहे. लाखो शेतकरी याचा मोठा प्रमाणावर वापर करीत आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे.
हापूस आंब्याचे उत्पादन व प्रत वाढविण्यासाठी तसेच फळातील साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्फुरदची मात्रा, उगम व देण्याची वेळ तसेच सल्फेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशिअम नायट्रेटच्या माध्यमातून शिफारसीत नत्र, पालाशच्या मात्रेबरोबर देण्याची त्यांनी दिलेली ठोस शिफारस अत्यंत उपयुक्त ठरली आहे.
१- मिथाईल सायक्लोप्रोपेन या संजीवकाचा वापर करून हापूस आंबा फळांची पिकण्याची क्रिया आठ ते दहा दिवस लांबवून फळांचा एकूण कालावधी २६ ते २८ दिवसांपर्यंत वाढविता येणे शक्य असल्याचे तंत्रज्ञान डॉ. बुरोंडकर व त्यांच्या सहकार्यांनी विकसित केले असून हे संशोधन आंबा उत्पादक व निर्यातदार शेतक-्यांसाठी मैलाचा दगड ठरले आहे.
हापूस आंब्यातील फळे न कापता आतील साका ओळखून व साकाग्रस्त फळे वेचण्याचे स्वयंचलित उपकरण विकसित करण्यामध्ये डॉ. बुरोंडकर व त्यांचे जेष्ठ तसेच कनिष्ठ सहकारी शास्त्रज्ञांनी कमाल केली आहे. हे उपकरण ९० टक्केपेक्षा जास्त अचूकपणे साकाग्रस्त फळे ओळखण्यास सक्षम ठरले असून व्यापारी तत्वावर वापरासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे देशाला आंबा निर्यातीतून प्रचंड चलन उपलब्ध होऊ शकेल.
जपानला फळमाशी विरहित आंबा निर्यातीसाठी अनिवार्य असलेल्या वाफ प्रक्रिया संशोधन प्रकल्पाचे डॉ. बुरोंडकर हे प्रमुख संशोधक होते. यात, आंबा फळे प्रक्रिया करण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी काढण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे फळांच्या दर्जावर विपरित परिणाम न होता, फळमाशीच्या पूर्ण नियंत्रणाबरोबरच फळातील साका व देठकुजव्या रोगाचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे हे तंत्रज्ञानही अत्यंत उपयुक्त ठरले आहे.
कोकणात समुद्रालगत जांभ्या खडकात आंब्याच्या बागांमध्ये आंब्याचा मोहोर आणि फळधारणा दोन ते अडीच महिने आधी मिळण्यासाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल (२५ टक्के द्रव्यस्वरूपात) २.५ मि.ली.प्रती मिटर झाडाच्या व्यासाप्रमाणे १५ मे (पाण्याची सोय असल्यास) किंवा १५ जून या कालावधीत जमिनीतून देण्याची त्यांनी ‘प्रमुख संशोधक’ म्हणून केलेल्या नव्या शिफारसीस मान्यता मिळाली आहे.
जागतिक बँक पुरस्कृत आंबा पिकावरील एन.ए.आय.पी. प्रकल्पासाठी तीन आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे ‘प्रमुख/ उपप्रमुख संशोधक’ म्हणूनही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सातत्यपूर्ण आंबा उत्पादनासाठी पंचसुत्रीची त्यांनी निर्मिती केली आहे.
त्यांनी ११ पदव्युत्तर आणि ५ आचार्य पदवी विद्यार्य्यांचे ‘मार्गदर्शक’ म्हणून काम केले आहे. थायलॅड, चीन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेत त्यांनी सहभाग नोंदवून पाच संशोधनपर लेख सादर केले आहेत. आंबा कार्यशाळेमध्ये १२, राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये १५ संशोधनपर लेख सादर केले असून ५ आधुनिक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यातील ४० शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यास दौऱ्यात त्यांनी जर्मनी, हॉलंड, ऑस्ट्रीया, बेल्जियम आणि स्विझर्लंड येथे मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. डॉ. बुरोडकर यांचे आंतरराष्ट्रीय पुस्तिकांमध्ये ३४ सारांश लेख, आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये २६, राष्ट्रीय परिसंवादामध्ये २३, विस्तार विषयक ३०, पुस्तकांमध्ये २ लेख प्रकाशित झाले असून ते तीन पुस्तकांचे लेखक आहेत. रेडिओ/दूरदर्शनवर त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.

सन १९९३ मध्ये त्यांना आंब्याच्या ‘सिंधु’ जातीच्या निर्मितीकरिता ‘एफ. आय.ई. फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार’ तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना सन १९९७ मध्ये कोकणातील उद्यान निर्मितीसाठी राज्य स्तरावरील ‘आबासाहेब कुबल पुरस्कार’, सन २०१५मध्ये ‘झी-मीडिया ग्रुपचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार’ विद्यापीठ स्तरावरील ‘उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या आंबा पिकामध्ये असलेल्या सखोल ज्ञानाचा आज महाराष्ट्राबरोबरच भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी प्रत्यक्ष तसेच विविध समाज माध्यमाद्वारे लाभ घेत आहेत.
आदर्श शिक्षक, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार कार्यात आगळा वेगळा ठसा उमटविणारे डॉ. मुराद बुरोंडकर हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने असंख्य विद्यार्थी, शेतकरी, शस्त्रज्ञ व विद्यापीठ परिवारातील सदस्यांनी त्यांच्या भावी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
– डॉ. संजय भावे
संचालक,
विस्तार शिक्षण संचालनालय,
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली