दापोली (अंबरीश गुरव) : सायकलप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांनी सायकल चालवून आरोग्य जपावे या जनजागृतीसाठी दापोलीकर रविवारी व्हेलंटाईन दिनी म्हणजे १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायकल फेरी काढणार आहेत.

सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त राहते, तसेच इंधन न वापरले गेल्यामुळे आपले पैसे वाचतात, प्रदूषण पण कमी होते आणि पर्यावरणही जपले जाते.

सायकलचे अनेक फायदे असल्यामुळे दापोलीकर आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करत आहेत.

सायकल फेरी आझाद मैदान दापोली- वडाचा कोंड- जालगाव ग्रामपंचायत- जालगाव बाजारपेठ- गव्हे- आझाद मैदान या मार्गावर आयोजित केली गेली आहे. सायकल फेरीचे अंतर ८ कि.मी. असेल.

त्यासाठी सकाळी ७.३० वाजता आझाद मैदानात जमायचे आहे. तेथे सायकल फेरी मार्गाबद्दल काही सूचना देण्यात येतील आणि सायकल फेरीला मान्यवरांच्या उपस्तितीत सुरवात होईल.

या सायकल फेरीमध्ये सायकल सावकाश, कमी वेगाने चालवल्या जातील. यामध्ये दापोलीकरांनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना घेऊन सामील व्हावे, जेणेकरुन पुढील पिढीमध्ये सायकल चालवण्याची आवड तयार होऊन दापोलीतील पर्यावरण जपले जाईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही शुल्क असणार नाही. सोबत मास्क बाळगणे जरुरीचे आहे. आपण आपली कोणतीही सायकल घेऊन येऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६.

दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. आपल्या भारत देशात पूर्वीपासून रक्षाबंधन, पाडवा, भाऊबीज, मकर संक्रांत, वटपौर्णिमा, ईद असे अनेक सण साजरे केले जातात.

त्यात अधिक भर म्हणून जगात सर्वत्र साजरे होणारे दिवस पण आपण आनंदाने जगतो. त्यामुळे भारतीय जास्त खुश आनंदी असतात असे इतर देशातील लोकांचे म्हणणे आहे.

दापोलीमध्येही सगळे सण आनंदाने साजरे होत असतात पण त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, त्यापासून शरीरासोबत पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याबद्दलही दापोलीकर जागरुक आहेत.

पर्यावरण रक्षण आणि तंदुरुस्त आरोग्यासाठी अनेक उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम दापोलीकर जबाबदारीपूर्वक नेहमीच करत असतात.