रत्नागिरी – आता परिस्थिती बदलत असून हुशार आणि प्रतिभावान लोक पुन्हा कायदा शिक्षणाकडे वळत आहेत आणि म्हणून समाजाच्या न्यायव्यवस्थेकडून खूप अपेक्षा आहेत, असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे श्रीमान भागोजोशेठ कीर विधी महाविद्यालय आणि भागेश्वर न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव परिपूर्ती कार्यक्रम शनिवारी राधाबाई शेट्ये सभागृहात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे वकिलांची समाजाप्रती कर्तव्ये याविषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

न्यायमूर्ती ओक म्हणाले की, आपण लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन काम केले पाहिजे आणि भरपूर अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या अनुभव सांगत असताना न्यायमूर्ती ओक म्हणाले की , न्यायमूर्तींना नेहमी सत्य बोलणारे वकील आवडतात. घटनेने दिलेले मूलभूत अधिकार सर्व स्तरातील सर्व लोकांना मिळतील, याची दक्षता घेणे हे वकिलांचे कर्तव्य आहे. असेही ते म्हणाले.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचा सत्कार संस्था कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन व भागेश्वर न्यासचे विश्वस्त मरिनर दिलीप भाटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष ॲड. प्रदीप नेने, ॲड. विलास पाटणे, उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, प्राचार्या सौ. तृप्ती देवरुखकर, ॲड. विनय आंबुलकर, सीए श्रीकांत वैद्य, विवेक कीर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.