एकीकडे शासन म्हणते पाण्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही. दापोलीची स्थिती पाहता पावसाळ्यात सुरू व्हायला एक महिना असला तरी दापोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारगोली धरणात पुरेसा पाणी साठा असूनही दापोली शहरातील नागरिकांना पाच दिवसाने एक दिवस पाणी मिळत आहे. हे मिळणारे पाणीही पुरेसे दिले जात नसल्याने दापोलीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकमेव असणाऱ्या धरणात पाणी साठा शिल्लक आहे. परंतु दापोली नगरपंचायतीचे उदासीन धोरण, नियोजनाचा अभाव व कामातील दिंरगाई याचा फटका ऐन उन्हाळ्याच्या वेळी नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नगरपंचायत शहरात पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा करते, अशातच लाईट जाते ही समस्या आहेच. त्यामुळे ज्या दिवशी पाणी येणार असते. त्याच दिवशी लाईट जाते. यासाठी सर्वस्व नगरपंचायत जबाबदार आहे, असे नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे. कारण नारगोली येथे धरणाच्या ठिकाणी असणाऱऱ्या ज्याकवेल साठी लाईट गेल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपालिकेने जनरेटर बसविले आहेत. परंतु पालिकेच्या उदासीन धोरण, कामातील दिरंगाई, आडमुठेपणा यामुळे नवीन असलेले जनरेटर वापराविना बंद अवस्थेत पडून आहे. याला अधिकारी व नगरपंचायत जबाबदार आहे. जेणेकरून पाणी असून लाईट गेले तर ताबडतोब जनरेटरचा वापर करून समस्या दूर होईल यासाठी पालिकेने जनरेटर तातडीने दुरूस्त करावे व दापोलीच्या नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती पालिकेने थांबवावी.
तसेच नारगोली धरणात पाणी साठा कमी असेल तर मागील वर्षाप्रमाणे बांधतिवरे येथील धरणातून टँकरने पाणी पुरवठा करावा व दापोलीच्या नागरिकांचे दररोज अथवा एक दिवस आड पाणी कसे मिळेल याची व्यवस्था ताबडतोब करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेच्या या अशा व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांना वर्षभराची पूर्ण पाणीपट्टी भरूनही आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. परिणामी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांना डबल आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे पालिकेच्या अशा कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.