माजी आमदार रमेश कदम व रईस अलवी यांच्याविरोधात केली  तक्रार

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे नेते, माजी आमदार रमेश कदम व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी यांच्याविरोधात धार्मिक, प्रक्षोभक व धमकींच्या विधानासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली असून या प्रकरणी दोघांवर कारवाई होईल, अशी आमची खात्री आहे, अशी माहिती कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ॲड. ओवेस पेचकर व उमेदवार शकील सावंत यांनी सोमवारी चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ॲड. ओवेस पेचकर यांनी महाविकास आघाडीकडून अपक्ष उमेदवार सावंत यांच्याबाबत होणाऱ्या अपप्रचाराचाही पुरेपूर समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीने एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. महाविकास आघाडी संविधानावर बोलते, परंतु हेच लोक मुस्लिम समाजातील उमेदवार न देता संविधानाची पायमल्ली करीत आहेत.

त्यांना संविधानाचे काहीही देणे-घेणे पडलेले नाही. मुस्लिम समाजाची यांना मते फक्त हवी असतात, मग उमेदवार नकोत, असे का? मुस्लीम समाजात शकील सावंत जन्माला आले हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवाल करीत आम्ही धर्म, जात- पात यांच्या नावावर मते मागत नसून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचेही ॲड. पेचकर यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघातून कोकण प्रादेशिक पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी शकील सावंत यांची १२ जानेवारीस उमेदवारी जाहीर करण्यात आली.

त्यांनी प्रथम अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या विकासासंदर्भातील मुद्दे घेऊन अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवत आहे.

आपण प्रचाराला सुरुवात केल्यापासून मी मुस्लिम समाजाचा आहे, म्हणून मला मत द्या, असे आजपर्यंत कोणालाही सांगितले नाही.

मुस्लीम समाजाची मत विभागणी होते म्हणून आमच्यावर आरोप करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटेनाटे आरोप देखिल केले.

दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देखिल काहींनी आटापिटा सुरू ठेवला आहे. आम्ही आजपर्यंत विकासाच्या मुद्यावरच प्रचार केला असून या निवडणुकीसंदर्भात कधीही धार्मिक प्रचार केलेला नाही.

कोकणचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने निवडणूक लढवित असून आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाने अगर राजकीय व्यक्तीने अन्य कोणत्या राजकीय पक्षाचे मत विभाजन करण्याकरिता उभे केलेले नाही.

मात्र, असे असून देखिल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम तसेच या पक्षाचे रत्नागिरी जिल्हा अल्पसख्यांक आघाडीचे अध्यक्ष रईस अलवी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिकतेचा रंग दिला आहे.

शकील सावंत मुसलमान असल्याने त्याला मत देऊ नये, ते मुसलमान समाजावर कलंक आहेत व यापुढे तुला सोडणार नाही अशा आशयाची विधाने केली आहेत.

तसेच सावंत हे भाजपची बी टीम असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मुस्लिम मतांचे विभाजन करण्याकरिता मी उभा आहे, असे खालच्या पातळीवरील बेछुट व खोटे आरोप माझेविरुद्ध केले आहेत, तशी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अपक्ष उमेदवार शकील सावंत उपस्थित होते.