रत्नागिरी : शिवसेना पक्षाच्यावतीने राज्यभरात पक्ष संघटन, निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी तसेच विविध माध्यमातून पक्ष संघटनेला बळकटी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

या अनुषंगाने राज्यभरात सक्रिय अभियान तसेच सोशल मीडियाचे जाळे पसरविण्यासाठी राज्यव्यापी कार्यकर्ता सोशल मीडिया मार्गदर्शन शिबिर राबविण्यात येत आहे.

याची सुरूवात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करण्यात आली आणि दुसऱ्या दिवसाचे सत्र रत्नागिरी जिल्ह्यात पार पडले.

राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी या कार्यक्रमाचे रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.

सरकारच्या प्रभावी योजना, सरकारची धोरणं प्रत्येक पदाधिकारी ते कार्यकर्त्यांपर्यंत तसेच जनमानसात एक प्रबळ भूमिका पोहोचविण्यासाठी एक साखळी आवश्यक असते.

या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चे बांधणी करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पक्षाच्या राजकीय रणनीतीसाठी विशेष काम करणाऱ्या “शोटाईम” संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियाची एक विशेष टीम मुंबईहून कोकणात या शिबिरासाठी दाखल झाली होती.

यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून शिबिरात सक्रीय सहभाग घेतला.

यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, उप जिल्हा प्रमुख राजेश मुकादम, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, संगमेश्वर तालुका प्रमुख प्रमोद पवार, युवा सेना ज़िल्हाप्रमुख मुन्ना देसाई, युवासेना जिल्हा प्रमुख (दक्षिण) केतन शेट्ये, राजपूर तालुका प्रमुख अश्फाक हाजू , राजापूर शहर प्रमुख सौरभ खडापे, शहर संघटक संकेत घाग, सौरभ मलुष्टे, वैभवी खेडेकर, दिशा साळवी, पूजा पवार, राजापूर महिला आघाडी तालुका प्रमुख शुभांगी डबरे, संगमेश्वर महिला आघाडी तालुका प्रमुख नेत्रा शिंदे, जिल्हा कार्यालय प्रमुख प्रशांत सुर्वे जिल्ह्यातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.