जागतिक पर्यटन दिवस कार्यक्रम साजरा

रत्नागिरी : कोकण हा पर्यटनाचा गाभा आहे. पर्यटक कोकणाकडे आकर्षित झाले पाहिजेत आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतून एकत्रितपणे सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज येथील अल्पबचत सभागृहात जिल्हा उद्योग केंद्र आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था तसेच कोकण पर्यटन उद्योग संघ यांनी एकत्रित रित्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी दुरदृश्य प्रणाली द्वारे सामंत यांनी मार्गदर्शन केले.

पालकमंत्री उदय सामंत मार्गदर्शन करताना

दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मार्गदर्शनात संबोधित करताना सांगितले कोकण हा पर्यटनाचा गाभा आहे. आंबा, काजू, फणस, मांसाहारी जेवण, कोकणाची खाद्यसंस्कृती  सातासमुद्रापार गेली पाहिजे आणि पर्यटक आपल्याकडे आले पाहिजेत. यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती व्हायला हवी, याकरीता पालकमंत्री म्हणून आवश्यक सर्व प्रयत्न मी करेन असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  निसर्ग संरक्षण करतानाच सोयीसुविधा दिल्या तर पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल व हे शाश्वत पर्यटन होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शनात केले. 

जिल्ह्यात कृषी पर्यटन, साहसी खेळ, खाडी पर्यटन, सह्याद्री, कातळशिल्प आणि समुद्रकिनारे या सर्वच ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे. तो वाढविण्यासाठी येथील स्थानिकानी अधिक पुढाकार घेतला पाहिजे. हॉटेल असोसिएशन, पर्यटन विषयक संस्था या सर्वांनी एकत्र येऊन सांघिक प्रयत्न करण्याची गरज आहे.   झिपलाइन, फेरीबोट पर्यटन यासह विविध प्रकारचे पर्यटनाचे चारशे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे आले आहेत असे त्यांनी सांगितले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी विविध जिल्ह्यातील पर्यटनाबाबत माहिती दिली.  तसेच प्री वेडिंग फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यासह नवनवे उद्योगांकरीता  शासनाचा उद्योग विभाग विविध योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवसभर चाललेल्या या महोत्सवामध्ये पर्यटन विषयक माहितीसत्र, चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

व्यासपीठावर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी प्रदीप सिंग, संजय यादवराव, इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, महेश सानप, विरेंद्र सावंत, सॅमसन डिसील्वा, मंगेश कोयंडे, युयुत्सु आर्ते आणि पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते.