खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला पुढाकार
नवी दिल्ली: दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.
२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेतून दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.
ही अभिनव संकल्पना त्यांना आवडल्यामुळे त्यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनास येण्याची तयारी दर्शवली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते व्हावे यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी सोमवारी त्यांची भेट घेऊन आग्रहापूर्वक निमंत्रण दिले.
यावेळी पंतप्रधान यांनी प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले.
कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार रविंद्र वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदार यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
या भेटीदरम्यान खासदार वायकर यांनी मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गारगाई-पिंजाळ प्रकल्प पूर्ण करण्यात यावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची जास्तीत जास्त व्याप्ती वाढवण्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले.
तसेच एम्सच्या धर्तीवर मुंबईत एक रुग्णालय सुरू करण्यात यावे, यामध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचाराची सुविधा करण्यात यावी, अशी विनंती खासदार वायकर यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली.
यावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली. त्याचबरोबर पी. एम. सी बँकेतील खातेधारकांना लवकरात लवकर दिलासा देण्याबाबत चर्चा करून निवेदनही खासदार वायकर यांनी पंतप्रधान यांना दिले आहे.