कवी मंगेश पाडगावकर यांच्या सानिध्यात बहरलेला साहित्यिक
कवी चेतन राणे माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असल्यामुळे ‘अहो राणे’ न म्हणता चेतन सध्या तुझं नवीन काय चाललंय? असेच मी विचारतो.
आता तर विचारणारच. कारण चेतन आता कोकण मराठी साहित्य परिषदेचा दापोली शाखेचा अध्यक्ष आहे. तिथे तो नवी चेतना नक्की आणेल.
चेतन सहित्यासोबतच व्यायाम प्रेमी देखील आहे. व्यायामपटू म्हणताच आपल्याला धाक वाटेल असे काहीसे रांगडे, राखट व्यक्तिमत्त्व मनात आपोआप उभे राहते.
तसा चेतन राणे अजिबात नाही. त्याच्या स्वभावात एक उपजत, गोड भाबडेपणा कायम दिसतो. माणुसकी जपणारा, सहृदय शिक्षक, उमदा साहित्यिक म्हणून तो मला व इतर अध्यापकांनाही प्रिय आहे.
माझ्या बाबतीत येता-जाता रोजच्या व्यापात तो जी आस्था व आदर दाखवतो, विचारपूस करतो. क्षेत्र एकच असल्यामुळे जे नाते जोडतो. त्यामुळे माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून तो मला ग्रेट वाटतो.
चेतन ग्रामीण भागातून स्ट्रगल करीत पुढे आलेलं व्यक्तिमत्त्व आहे. २०१६ मध्ये शरीरसौष्ठव क्षेत्रात ‘उगवता तारा’ म्हणून त्याचा गौरव शिवसेनेतर्फे झाला होता.
कोकणी तरुणाला परिस्थितीशी झुंज तर द्यावीच लागते. सेवाव्रती शिंदे गुरुजींचे मार्गदर्शन आणि नवभारत छात्रालयाचा मिळालेला आधार निवारा यामुळे वराडकर कॉलेजमधील त्याचे शिक्षण सुखरूप पार पडले.
पदवी परीक्षा पातळीवर तो कॉलेजमध्ये सर्व प्रथम आला. नंतर मुंबईला जाऊन बी.एड. करताना तिथेही सर्वप्रथम येऊन त्यांने बुद्धीची चमक व कोकणी धमक दाखवली.
जिद्द व प्रामाणिकपणाची निर्व्यसनी बैठक हे त्याच्या शैक्षणिक यशाचे ठळक कारण. नवभारत ने दिलेली शिस्त तर आहेच.
आजही छात्रालयाच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग देऊन हा गुणी तरुण ते ऋण फेडतो आहे. त्याचं मुळगाव विरसई ता. दापोली.
संध्या तांबट आता सौ. वेदिका राणे या सुविद्य युवतीशी विवाह झाल्यावर चेतन अधिकच कुटुंबवत्सल बनला आणि संस्कृती व अद्विता या दोन कन्या रत्नाचा पिता म्हणूनही तो आपलं प्रपंच कर्तव्य उत्तम पार पाडत आहे.
सध्या समाजात ज्या उनाडक्या थिल्लरपणा दिसतोय त्याबद्दल चेतनला चीड येते. अनेकदा आमच्या सामाजिक विषयावर गप्पा होतात. चर्चा घडते. तो तळमळीने बोलतो.
तितक्याच उत्कटतेने इमानदारीत शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतो. हिंदी व भूगोल हे त्याचे मुख्य विषय. ए.जी. हायस्कूलच्या उंबर्ले येथील म. ल. करमरकर भागशाळेत गेली बारा वर्षे तो शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे.
त्या आधी चार वर्षे पाजपंढरी येतील श्रीराम हायस्कूलमध्येही त्याने अध्यापन केले. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचा पुढाकार असतोच ‘राष्ट्रीय प्रेरणा गीते’ हे प्रेरक पुस्तक त्याने तयार म्हणजे संपादित केले. त्या संकलनाचे लेखी कौतुक कवी मंगेश पाडगावकरांनी केले होते.
सतत धावपळ करणारा चेतन राणे पत्रकारितेतही कार्यरत आहेच. दैनिक तरुण भारत सारख्या दैनिकात त्यांनी बातमीदारी केलीच. पण संस्कृती क्रिएशन या त्याच्या यूट्यूब वाहिनीचा कॅमेरा आता त्याच्या हातात आहे.
माय कोकणचे संस्थापक संपादक मुश्ताक खान यांच्या स्वयंपूर्ण पत्रकारितेबद्दलही त्याला विशेष आदर आहे.
तरुण वर्गाची हमखास दाद मिळवणाऱ्या मजेदार व मार्मिक कविता तो लिहितो. शब्दांवर प्रेमाचे चार अत्तर थेंब शिंपडून कविता मिश्किल बनवतो.
‘फेसबुक’ ही त्याची काव्यरचना सुप्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील कार्यरत असलेला हा उत्साही शिक्षक अनेक काव्यसंमेलनात श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवत आला आहे. त्याचा स्वतःचा काव्यसंग्रह येईलच! चेतन श्रद्धालू आहे व त्यामुळे अधिक नम्र आहे.
त्याच्या सौभाग्यवती वेदिका या श्री रामराजे महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. या सुसंस्कृत दांपत्यांची वाटचाल शांतपणे सुखाने सुरू आहे.
अनेक जेष्ठ मंडळींचे सहकार्य व मार्गदर्शन (उदा. डॉ. प्रशांत मेहता) ही माझी पुण्याई आहे असे तो मानतो.
कोकण मराठी साहित्य परिषदेबद्दल बोलताना तो म्हणाला की विद्यार्थी व एकूण तरुणाईला वाचन संस्कृती, काव्य, ललित साहित्य इकडे वळवले पाहिजे आणि को.म.सा.प.च्या माध्यमातून माझा व सहकाऱ्यांचा तसाही प्रयत्न राहणार आहे.
स्वतः काव्यलेखन करणाऱ्या सुनील कदम, मंगेश मोरे, प्रा. कैलास गांधी, शिक्षक बाबू घाडीगावकर अशा कितीतरी साहित्य प्रेमींची साथ चेतनला कोकण मराठी साहित्य परिषद दापोली शाखेचा कार्यभार सांभाळताना लाभत आहे.
चेतन एका काव्य संमेलनासाठी थेट श्रीलंकेतील सिलोनला गेला होता, हे मला सहज आठवले. त्याची काव्य प्रेरणा किती भरारी मारू शकते त्याचे हे उदाहरण.
तर एकूण या प्रयत्नावादी, आशावादी, सज्जन कार्यकर्त्याला, समाजभान असलेल्या गुणी गृहस्थाला माझ्या मनापासून सदिच्छा! आगे बढो !