दापोली: दापोली तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळातील नुकसान झालेल्या नागरिकांकडून शासन दिलेली रक्कम परत मागत असून ती रक्कम नागरिकांनी परत न केल्यास त्यांचे घरावर शासकीय बोजा किंवा जमिनीचा लिलाव होईल, अशी नोटीस निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या आडे येथील नागरिकांना शासनाने दिली आहे.

येथील नुकसानग्रस्त यांना नुकसानभरपाई म्हणून शासनाने १ लाख ६० हजार इतकी रक्कम ही शासकीय सर्वेक्षण करून लाभार्थी यांच्या खात्यात जमा केली होती. मात्र दिलेली रक्कम ही अतिरिक्त आहे, असे आता शासन सांगत आहे.

आडे येथील समुद्र किनारी असणाऱ्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाची पाहणी करून शासनाने त्यांना १ लाख ६० हजार अनुदान दिले त्या पैशातून या नुकसानग्रस्तांनी आपल्या घराची दुरूस्ती केली मात्र या घरांचे पूर्णतः नुकसान झाले नाही अशी तक्रार या घरांबाबत आली आहे.

त्या नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियर यांनी या घराचे फेर सर्वेक्षण केले त्या नुसार ६० हजारांचे नुकसान झाले आहे. असा रिपोर्ट शासनाला दिला त्यानुसार या नुकसानग्रस्तांनी उर्वरित १ लाख शासनाला परत करावेत, असे शासन सांगत आहे.

यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून आम्हाला आता आत्महत्या करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, असा पवित्रा या नागरिकांनी घेतला आहे.

याबाबत दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी या नागरिकांसह दापोली प्रांत अधिकारी शरद पवार आणि दापोली तहसिलदार वैशाली पाटील यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली.

दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळात ३० हजार लोकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी दीडशे कोटी नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले. असे असताना या सात लोकांकडूनच शासन दिलेली रक्कम का वसूल करत आहे, असा सवाल आता या वेळी उपस्थित करण्यात आला, तर फेरसर्वेक्षण हे इंजिनियर यांनी भीतीपोटी केले आहे असा सूर देखील या वेळी निघाला.

भरपाई रक्कम परत मागण्याबाबत शासनाने काहीतरी मार्ग काढून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी प्रशासन यांच्याकडे केली आहे.