रत्नागिरी : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची म्हणजेच प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माय कोकणच्या बाबतीत नुकताच हा प्रकार घडला आहे. त्याच्या निषेधार्थ सर्व पत्रकार एकवटले आहेत. या दडपशाहीच्या विरोधात १६ जानेवारीला सकाळी साडेअकराला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत.

सर्व पत्रकारांची महत्त्वाची बैठक मंगळवारी शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. भविष्यात पत्रकारांच्या
व्यक्ती स्वतंत्र्यावर गदा येऊ नये, यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे.

जिल्ह्यातील उत्तर भागातील दोन राजकीय नेत्यांमध्ये टोकाचा
संघर्ष आहे. तत्कालीन आमदार संजय कदम यांनी तत्कालीन पर्यावरणाशी संबंधित मंत्र्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. इतर मध्यामांप्रमाणे या मोर्चाचं वृत्त माय कोकण चॅनलनंही प्रसिद्ध केले. परंतु व्यक्तीद्वेषामुळे माय कोकणवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. या मोर्चाशी माय कोकणचा काडीचाही संबंध नव्हता. फक्त काढण्यात आलेला मोर्चा माय कोकणनं आपल्या चॅनलवर दाखवला होता.

राजकीय पुढाऱ्यांनी अशा प्रकारे
व्यक्तीद्वेष ठेऊन पत्रकारांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात हे प्रकार घडु नयेत, पत्रकारांचे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी सर्व पत्रकार एकवटले आहेत.

या कृती विरुद्ध पत्रकार १६ जानेवारीला सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर
निदर्शने करणार आहेत.