कशेडी : खेडहून मुंबईला निघत असलेले आमदार योगेश कदम यांच्या गाडीला आज शुक्रवार दि.०६ रोजी रात्री 10.15 वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्याला चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणा-या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली .यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.