दापोली (वार्ताहर) : आज १५ जून रोजी दापोली तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं.१ या शाळेत आशिष रविकिरण बूरटे यांनी आजी ज्योती बुरटे यांचे स्मरणार्थ दप्तर तर साखळोली मुंबई ग्रामस्थ मंडळ यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपांने सुरु झाले नवे शैक्षणिक वर्षे.

आज पहिलीमध्ये प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करणेत आले. तद्नंतर पुस्तकदिन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गौरीवले यांंच्या अध्यक्षतेखाली मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली तसेच वह्या व दप्तर वाटपही मान्यवरांचे हस्ते करणेत आले.

यावेळी मुंबई मंडळाचे सचीव सुनिल जाधव तसेच सदस्य सुरेश मिसाळ, माजी केंद्रप्रमुख रविकिरण बुरटे, आशिष बुरटे, मुख्याध्यापक संजय मेहता आदिंनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

शाळेला गावचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीचे स्मरण करीत मुंबई मंडळाचे सचीव सुनिल जाधव यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, शाळेला ग्रामस्थ, माजी विद्यार्थ्यांनी सढळ हस्ते सहकार्य करुन शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे सुचित केले. तर संजय मेहता यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. गोड खाऊ वाटपाने समारंभाची सांगता झाली.

Advertisement