दापोली : तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी आज 1284 बालकांनी शाळेच्या प्रांगणात पहिलं पाऊल टाकलं. पहिलीच्या वर्गात श्री गणेशा करणार्‍या नवगतांचं ढोल ताशाच्या गजरात दापोली तालुक्यात ठीक ठीकाणी स्वागत करण्यात आले. आईचं बोट सोडून शाळेत येणार्‍या मुलांचे औक्षण करुन पुष्पवृष्टी करत त्यांची मिरवणूक काढणेत आली.

गावागावात विविध उपक्रम राबवत. शाळेच्या पहिल्या दिवशीच काही ठिकाणी वह्या, दप्तरे, लेखन साहित्य देण्यात आले; तर सर्व शाळांमध्ये नवी पाठ्यपुस्तके देऊन पुस्तक दिन ही साजरा करण्यात आला.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रथम वर्गात प्रवेश घेणाऱ्या 1284 विद्यार्थ्यांचे ढोल,0ताशाच्या गजरात फुलांची उधळण करून स्वागत करताना सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

प्रवेशोत्सवात कादिवली येथे तालुक्याचे आमदार योगेश कदम उपस्थित होते. यावेळी जि.प.शाळा आणि शिक्षण विभागाबद्दल आमदार योगेश कदम यांनी गौरवोद्गार काढले. जि.प.शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपले नेहमी सहकार्य असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, व्हिजन दापोलीचे अध्यक्ष तथा कादिवलीचे केंद्रप्रमुख धनंजय शिरसाट, ग्रा.पं कादिवलीचे सरपंच प्रमोद माने, उपसरपंच अनंत काते, शाळा व्यव.समितीचे अध्यक्ष शिरीष चव्हाण, उपाध्यक्ष गोपीचंद पवार, शा.व्य.समितीचे सर्व सदस्य व गावातील मान्यवर उपस्थित होते.

१५ जून ते ३० जून हा कालावधी पट नोंदणी व शाळा प्रवेशोत्सव पंधरवडा म्हणून साजरा होणार असून यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे गणवेश शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. जरी अद्याप हे गणवेश प्राप्त झालेले नसले तरी लवकरच हे प्राप्त होतील असे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.

शाळेच्या पहिल्या दिवशी दापोलीत १ ली ते ८ वीच्या ९ हजार ७२१ विद्यार्थ्यांना ४० हजार ५२२ पाठ्यपुस्तकांचे वितरण करणेत आले.

ही पुस्तके प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी ही पुस्तके मुलांच्या हातात मिळाली असल्याची माहिती दापोली शिक्षण विभागाने दिली आहे.