दापोली : शहरातील सुप्रसिद्ध नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि संस्था अंतर्गत असलेले यु. ए .दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

दापोलीतील रसिक रंजन हॉलमध्ये मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते.

या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन मुंबई येथील फहीम मोमीन यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे यांनी भूषवले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सिराज रखांगे, स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, यु. ए .दळवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नुजहत रखांगे व संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

इयत्ता दहावी व बारावीचा संपूर्ण निकाल मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी तर यु.ए.दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलचा निकाल नुझहत रखांगे यांनी मांडला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष लियाकत रखांगे यांनी विद्यार्थ्यी व शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर त्यांनी शाळेच्या व  कॉलेजच्या निकालाबद्दल समाधान देखील व्यक्त केलं.

विद्यार्थ्यांनी आपलन ध्येय मोठं ठेवून ते पूर्ण करण्यास अहोरात्र मेहनत घ्यावी, असं मार्गदर्शन फहीम मोमीन यांनी केलं. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये चांगलं करण्याची क्षमता असते ती त्याने ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे देखील ते म्हणाले.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा. जमिर जमादार यांनी तर उपस्थितांचे आभार तन्वीर आराई यांनी मानले.