दापोली : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीएंच्या सन्मानार्थ ३० जूनला सायकल फेरी काढण्यात आली आणि दापोलीतील सीएंचे आभार मानण्यात आले.

या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, केळस्कर नाका, बुरोंडी नाका, लाल कट्टा, नर्सरी रोड, आझाद मैदान असा ५ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते.

तसेच दापोलीतील पहिले सीए संदिप खोचरे, पहिल्या महिला सीए अनुराधा परांजपे, किरण परांजपे, श्रेयस काकिर्डे, अंजली फाटक, कौस्तुभ दाबके, मुनाझ्झा शेख, ऋषिकेश शेठ आदी सायकल चालवत सहभागी झाले होते.

देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली सीएची परीक्षा, आर्थिक क्षेत्रातील विविध माहिती आदीबद्दलचे मार्गदर्शन या सर्वांनी गप्पा गोष्टी करत केले.

भारताच्या प्रगतीमध्ये यांचे मोठे योगदान आहे. सीए दिवसाच्या या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. सायकल फेरी मार्गावरील काही मान्यवर डॉक्टरांना भेटून डॉक्टर दिवसाच्या पण शुभेच्छा देण्यात आल्या.