रत्नागिरी : दापोली नगरपंचायतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचे पुत्र फैजान रखांगे यांना रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध नेत्यांवर कारवाईचं सत्र सुरू असतानाच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने नगरसेवकपुत्राला अटक केल्याने नगरपंचायतीतील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दापोली नगरपंचायतीचे निलंबित लेखापाल दीपक सावंत यांनी नगरपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांना यापूर्वीच पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

आता याच कथित भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या पुत्राचाच नंबर लागल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दापोली नगरपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

याच प्रकरणात फैजान रखांगे यांच्या खात्यावरती दीपक सावंत यांनी जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक फैजान रखांगे यांच्या अटकेसाठी लक्ष ठेवून होते.

मात्र फैजान रखांगे गेले काही दिवस भारता बाहेर गेल्याची चर्चा होती. मात्र ते दापोलीत येताच पथकाकडून दापोली येथून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अन्वर रखांगे यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.