दापोली : दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संजय वाडकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं आहे. ते अत्यंत मितभाषी आणि प्रेमळ होते. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा होता. त्यांनी कायम लोकांना सहकार्याची भूमिका घेतली होती.

दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक असताना शहर सुंदर कसं होईल याकडे लक्ष दिलं. त्यांच्या असं अचानक जाण्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

संजय वाडकर हे उत्तम क्रिकेटर होते. एकेकाळी दापोलीतील आझाद मैदान त्यांनी गाजवलेलं आहे. दापोली कुणबी पतसंस्थेचे ते माजी अध्यक्ष देखील होते. दापोली काॅंग्रेस पक्षाचे ते पदाधिकारीही होते.

संजय वाडकर उर्फ संज्या हे दापोली क्रीडा मंडळांच्या कामगिरीचे साक्षीदार होते. रत्नागिरी जिल्हा असोसिएशनने आयोजित केलेल्या लेदर बाॅल टुर्नामेंटमध्ये अंतिम विजेता संघाचे ते सदस्य होते. दापोली क्रीडा मंडळाच्या स्मरणात रहाणारी कामगिरी त्यांनी बजावली आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज शनिवारी सायंकाळी 4 वाजता काळकाई कोंड येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या जाण्यानं दापोलीतील अनेक मान्यवर व्यक्तींनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.