माझे पितामह गुरुवर्य पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते सर 2 जून 2023 रोजी 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत, याचा सार्थ अभिमान मला होत आहे.

या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त दादांबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. दादांच्या अचूक आठवणींना उजाळा देण्याची मला संधी मिळाणं, हे मी माझे अहोभाग्य समजतो.

दादांचा आणि माझा संपर्क 1984 साली राजकमल मेडिकल स्टोअर्स येथे आला. मी तसा दापोलीत नुकताच आलो होतो. आईसाठी डॉ. पापरीकरांनी औषधे लिहून दिली होती.

ती आणण्यासाठी मी दादांच्या दुकानात गेलो. त्यांनी औषधे काढली, किती पैसे झाले मी विचारले, परंतु त्यावेळी माझ्याकडे अपुरे पैसे होते.

मी दादांना म्हटले राहू द्या मी नंतर परत येऊन औषधं घेऊन जाईन. माझ्या स्थिती त्यांच्या लक्षात आली. पैसे कमी आहेत म्हणून असं म्हणतोस का? नंतर येतो.

आम्ही काढलेली औषधं घेऊन जा पैसे कमी असतील तर नंतर आणून द्या असं दादा म्हणाले. फारशी ओळख नसतानाही दादांची ही आपुलकी मनाला भावली. तो क्षण मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही

त्यानंतर दादांनी माझ्या कुटुंबीयाविषयी माहिती मिळवली नंतर त्यांनी आमचा मुलगा म्हणून स्वीकार केला. आम्हा दोघा भावांना त्यांनी कायमच मुलासारखी वागणूक दिली.

दादांनी आमच्या कुटुंबीयांना खऱ्या अर्थाने दापोलीकर केले‌ आणि ते आम्ही अंतर्मनाने स्वीकारलं.

आज आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत त्यामध्ये दादा इदाते यांचा वाटा मोठा आहे. किशोर फर्निचर मार्टच्या माध्यमातून आम्ही दापोलीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करू शकलो ते फक्त दादा यांच्यामुळे. त्यांच्या हस्तेच किशोर फर्निचर या दुकानाचे उद्घाटन झाले होते.

दादांनी मला आयुष्यामध्ये अनेक मोलाचे धडे दिले आहेत. त्यांच्यासोबत राहून दापोली व तालुक्याची संपूर्ण माहिती मिळवून, इतरांशी कसे वागावे? मोजकेच कसे बोलावे? इमानदारी व सचोटीने व्यापार कसा करावा? ग्राहक हा आपला दैवत आहे, हे मानून त्यांना आपण सेवा द्यावी या सर्व गोष्टी मी दादा यांच्याकडूनच शिकलो.

पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबात कॅन्सरचा शिरकाव झाला होता. टाटा हॉस्पिटलमध्ये आईचं ऑपरेशन होणार होतं. रक्त कमी पडेल अशी स्थिती होती. दादांना ही अडचण सांगितली. टाटा हॉस्पिटलच्या रक्तपेढी इन्चार्ज असलेल्या डॉक्टरांना दादांनी एक चिठ्ठी लिहून दिली. आम्हाला जेवढा रक्त लागेल तो उपलब्ध करून देण्यात यावा असं त्यांनी लिहिल. सुदैवाने आम्हाला त्या रक्ताची आवश्यकता भासली नाही. पण दादांच्या या पत्राचा शिवाजीराव कदम यांना उपयोग झाल. तेव्हा त्याची तिची खरी किंमत मला कळली.

थोर साहित्यिक, लेखक, प्रवचनकार, समाजसेवा हे ब्रीद घेऊन सेवा देणारे व्यक्तीमत्व, साधी राहणी उच्च विचार, भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमान काळाकडे दूरदृष्टी ठेवणारे व्यक्तिमत्व असलेल्या दादा इदाते यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिलेत. त्या काळात दादांना अनेक धक्के सहन करावे लागले. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि कौटुंबीक अशा अनेक आघाड्यांवर आलेल्या संकटांवर मात करून ते पुढे वाटचाल करत राहिले. धीराने या सगळ्या संकटांशी मुकाबला केल्यानंतर ईश्वराने त्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती दिली. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांचा अत्यंत प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने गौरव केला.

संपूर्ण भारतात भटक्या विमुक्त जाती जमातीचे एकत्रीकरण दादा यांनी केलं. केंद्र सरकारने त्यांना मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती देऊन अभ्यास करण्याची विनंती केली. या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशभर दौरे करून अभ्यास केला आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांचं जगणं सोपं व्हावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.

दादा इदाते यांचं आज संपूर्ण भारतभर उदो उदो होत आहे. त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. या सगळ्या गोष्टी पाहून मला एक दापोलीकर म्हणून प्रचंड अभिमान वाटत आहे.

दादांसोबत राहून मंडणगड, आंबडवे, दहागाव, दापोली या ठिकाणच्या संस्थेत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेमार्फत देखील समाज कार्य करण्याची मला संधी मिळाली. दादा इदाते यांच्या प्रेरणेने आज मी 31 संस्थांमध्ये कार्यरत आहे. डॉक्टर साठेंच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाचे महत्त्व समजून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे भरवली.

मला सार्थ अभिमान आहे की, दादांच्या रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये त्यांना मी शुभेच्छा देत आहे. मला समाजामध्ये थोडं फार जे काही समाजकार्य करता आलं ते केवळ आणि केवळ दादा इदाते यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे. यासाठी मी दादांचा सदैव ऋणी राहीन.

समाजातील उपेक्षितांच्या उन्नतीसाठी संघकार्याच्या माध्यमातून आयुष्य खर्च केलेल्या आमचे प्रेरणास्रोत पितातुल्य गुरुवर्य मार्गदर्शक कर्मवीर पद्मश्री आदरणीय दादासाहेब इदाते सरांनी हसतच हसत हसत शंभरी पार करावी हीच या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना.

– हसमुख जैन, दापोली