रत्नागिरी: केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयामार्फत सहकार चळवळ बळकट करण्याकरीता तसेच सहकार चळवळ तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्या करीता विविध स्तरावर कार्यवाही करणेत येत आहे.

याचाच एक भाग म्हणून “सहकार से समृवी” अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सक्षमीकरणाकरीता बँकेने चेअरमन कृषीभूषण डॉ. तानाजी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी तालुका क्षेत्रिय कार्यालयामार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे तसेच जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील, रामभाऊ गराटे व बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये ४० संस्थांचे पदाधिकारी व सचिव उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी केंद्र शासनाच्या सहकार विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले. केंद्र शासनाने सहकारी संस्थांकरीता त्यांचे पोटनियमामध्ये दुरुस्ती करुन नवीन १५१ प्रकारचे व्यवसाय संस्थांना सुरु करता येतील याबाबत देखील मार्गदर्शन केले. बँकेचे संचालक श्री. जगानन पाटील यांनी बँकेच्या विविध धोरणात्मक गोष्टींची मांडणी करताना संस्थांनी

देखील पुढे येवून सहकार बळकटीकरणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत मांडले. त्याचबरोबर जिल्हा बँक

नेहमीच सहकार रुजविण्यासाठी वाढविण्यासाठी कटीबध्द असुन संस्थांच्या आवश्यकतेनुसार कर्जपुरवठा करणेस बॅंक तयार असले बाबतचे देखील आपले मत व्यक्त केले.

या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी आपल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही, असे सांगताना सहकारामध्ये चांगले लोकांनी येवुन त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सहकार वाढवायचा असेल तर संस्थांमध्ये सुशिक्षित सचिव असणे आवश्यक आहे. तसेच संस्था वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार विभागामार्फत केलेल्या पोटनियम दुरुस्तीचा लाभ घेवुन संस्थांनी आपल्या भागाची गरज ओळखण नवनवीन व्यवसाय सुरु केले पाहिजेत, संस्था संगणीकरण झाले पाहिजे.

ज्या संस्थांकडे जागा उपलब्ध आहेत तिथे शासन योजनांचा लाभ घेवुन नवनवीन प्रकल्प राबविले पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमुळे सहकाराला नवीन चेतना मिळेल, रत्नागिरी तालुक्यातील सहकार वाढण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करुन सर्व संस्थांनी संस्था सक्षमीकरणावर भर द्यावा असे आवाहन केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक बँकेचे अधिकारी संदीप तांबेकर यांनी केले. सदर कार्यक्रमास सहकार खात्याचे सहा. निबंधक ऑफीस मधील श्रीम. आंबेकर, ऑडीट ऑफीसचे महेश जाधव उपस्थित होते. सदर कार्यक्रम आयोजनासाठी बँकेचे अधिकारी नरेंद्र जाधव, प्रदिप परीट, श् विठ्ठल गंगावणे यांनी विशेष प्रयत्न केले.