सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चढ-उतार होत आहेत. अशाही परिस्थितीत स्वत:ला स्थिर ठेवून आपल्या विभागाचे कामकाज गतिमान करणे तसे अवघड आहे. तेही उद्योग मंत्रालय विभाग म्हणजे या विभागावर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अवलंबून असते.
अशा उद्योग विभागाचा कायापालट करतानाच पायाला भिंगरी लागल्यासारखे दौरे करुन औद्योगिक विकासाचा पाया विस्तारीत करण्यासाठी प्रयत्न करणारे तसेच आतापर्यंत परदेशात उद्योगासाठी सर्वाधिक गुंतवणूकीसाठी विशेष मेहनत घेणारे रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत होय.
मुळात राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून मंत्री उदय सामंत यांना दोन वेळा पालकमंत्री तसेच म्हाडा अध्यक्ष, उच्च तंत्रशिक्षण मंत्री तसेच आता उद्योगमंत्री पद मिळाले आहे.
साहेब कोणत्या पक्षात गेले तरी त्यांच्या कामाची पद्धत आणि असलेलं विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांचे वलय दिवसेंदिवस विस्तारीत होत आहे. यापूर्वी अनेक उद्योगमंत्री होवून गेले मात्र मंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाची सुत्रे हाती घेतल्यापासून पहिल्याच दिवशी त्यांनी एमआयडीसी विभागाचा आढावा घेतला.
नवीन उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देवून रोजगार निर्मिती करण्यासाठीचे नियोजन केले. आणि या प्रयत्नांना बहुमोल सहकार्य आणि पाठिंबा मिळाला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा.
केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्राने एप्रिल 2022 ते मार्च 2023 या आर्थिक वर्षात 1,18, 422 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केलेली आहे.
ती देशाच्या एकूण एफडीआयच्या 32 टक्के आहे. महाआघाडीच्या काळात पिछाडीवर गेलेला महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकांवर आला. जून 2022 ते जुलै 2023 या कालावधीत 31 सामंजस्य करारांवर राज्याने स्वाक्षरी केली, त्यातून राज्यात 1, 48, 930 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून 1, 47, 969 रोजगार उपलब्ध होणार आहेत. दावोसमध्येही महाराष्ट्र सरकारने 19 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या केल्या.
त्यापैकी 11 प्रकल्पांना भूखंडवाटपही करण्यात आले आहे. डिसेंबर 2022 मध्ये सी.जी.कॉन्क्लेव्हच्या व्दितीय आवृत्तीचे आयोजन एमआयडीसीने केले होते. त्यात 25 पेक्षा अधिक राष्ट्रांचे वाणिज्य दूत उपस्थित होते. अँडव्हान्टेज महाराष्ट्र-एक्स्पो 2023 मध्येही एमआयडीसीने सक्रियपणे सहभाग नोंदवला.
त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील उद्योगांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले होते. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने जून महिन्यात गुंतवणूक रोड शो साठी तैवानला भेट दिली. तिथे गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने प्रचार केला.
गुंतवणूकीच्या संधीची चाचपणी करण्यासाठी डि लिंक, फॉक्सकॉन, गागोरो आणि अॅक्वेल यासारख्या कंपन्यांना भेटही दिली. महाराष्ट्राच्या प्रतिधिनी मंडळाने लंडन टेक सप्ताहातही सहभाग नोंदवला. महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून एमआयडीसीने तिथे सादरीकरण केले. सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने दक्षिण कोरियातील उद्योजक आणि व्यापारी संघटनांच्याही भेटी घेतल्या.
यातूनच महाराष्ट्र सरकारकडे परकीय गुंतवणूकदारांचा बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. मंत्री सामंत यांनी सतत बैठका घेवून, राज्यातील एमआयडीसी विभागांचा आढावा, दौरे तसेच रत्नागिरी आणि रायगड मतदार संघाला वेळ देणे, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे.
याचबरोबर मुंबईत जनता दरबार घेवून नागरिकांच्या समस्या सोडवणे याशिवाय मुख्यमंत्री यांच्यासोबत सरकारच्या विविध उपक्रम आणि प्रश्नांमध्ये विश्वासू प्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे ही भूमिका चोखपणे बजावत आहे.
दिवसरात्र तेही महाराष्ट्राच्या विकासासाठी झटताना एका सेवकाच्या भूमिकेत ते दिवसभर वावरत असतात, आलेल्या प्रत्येक माणसाची कामे झाली पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, कोणाची गैरसोय होता कामा नये.
तरुणांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठीच उद्योग विभाग असल्याची खर्या अर्थाने जाणीव कोणी करुन दिली असेल तर ते उद्योग मंत्री उदय सामंत यांनीच.
उद्योग मंत्री म्हणून काम करताना अनेक टिकाटिप्पणीला उत्तरे देत न बसता फक्त आपल्या ध्येयाकडे कामाकडे सामंत फोकस करतात, कौतुकास्पद बाब म्हणजे संपूर्ण उद्योग विभागाची त्यांची टीम त्यांच्याप्रमाणेच म्हणजे गतिमान काम करते. हे सर्व अधिकारी आपली वेळ न पाहता या विभागासाठी काम करतात आपले साहेब कोणतीही पर्वा न करता नागरिकांसाठी काम करतात तर आपणही त्यांच्यासोबत तितकचं प्रामाणिपणे काम केले पाहिजे ही तळमळ आपोआप एमआयडीसी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात अनेक महत्वाचे उद्योग बंद पडले होते तसेच काही उद्योग बाहेरच्या राज्यात स्थलांतरित होण्याच्या मार्गावर होते मात्र मंत्री उदय सामंत यांनी हे होवू दिले नाही.
आपल्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, कोणतेही उद्योगधंदे बंद पडता कामा नये आणि जे बंद पडले आहेत त्यांना पुर्नजिवीत कसे करता येईल यासाठी त्यांनी संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी बोलून त्यांच्या अडचणी सोडवल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
आज रत्नागिरी जिल्ह्याचा जो विकास होतेय ते उद्योग विभागात झालेल्या अमुलाग्र बदलामुळेच. एमआयडीसीत अनेक नवीन उद्योग येवू घातले आहेत. खेड लोटे येथे आज कोकाकोला कंपनी आणि रेल्वेचे कोच बनविणारी कंपनी सुरु होत आहे, ही फार मोठी बाब आहे.
इतक्या मोठ्या कंपन्यांमुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना आपोआपच हाताला काम मिळणार आहे तसेच विकासाची उंचीदेखील रुंदावणार आहे. आज संपूर्ण देशात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री कोण आहेत त्यांचे नाव देखील माहिती आहे. ही ओळख आपल्या कामातून मंत्री उदय सामंत यांनी मिळवली आहे.
केवळ नावासाठीच मंत्री न राहता ज्या विश्वासाने नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे त्या विश्वासार्हतेला आपण पात्र ठरले पाहिजे ही त्यामागची त्यांची भूमिका आहे. 24 तासातले 18 तास काम करणारा लोकप्रतिनिधी आपल्या जिल्हावासियांसाठी प्रेरणादायी आहेच मात्र आपल्या महाराष्ट्रासाठीही भूषणावह आहे.