दापोली : भारत हा देश ऋषी आणि कृषि संस्कृतीचा देश आहे असे प्रतिपादन दादा इदाते, केंद्रीय अध्यक्ष, भटके विमुक्त जनजाती कल्याण व विकास बोर्ड नवी दिल्ली यांनी केले.
टेटवली येथील कामधेनू गोशाळा येथे आयोजित गोसंवर्धन व पंचगव्य व गांडुळखत निर्मिती या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारत देशामध्ये आपण जन्मलो हे आपलं भाग्य आहे. कोकण हा प्रदेश भगवान परशुरामानी निर्माण केला.
या प्रदेशातच शेती सुरु झाली. गाय ही कामधेनू आहे. गायीच्या शेणापासून निर्माण केलेल्या गांडुळखताला प्रचंड मागणी आहे. नापीक झालेल्या जमिनी सुपिक करण्याची ताकद या गांडुळखतामध्ये आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर आवश्यक ती माहिती उपलब्ध आहे. संयोजकांनी आयोजित केलेल्या या स्तूत्य उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले कुलगुरु डाॅ. संजय सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ हे स्थानिक गरजांवर आधारीत कृषि संशोधन करण्यावर भर देत असून शेळीची कोकण कन्याळ, गायीची कोकण कपिला या निवड पध्दतीने विकसीत केलेल्या जातींची नोंदणी झाली असून शेतकऱ्यांनी आपल्याकडे काय चांगले आहे याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले.
विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण, डाॅ. संजय भावे यांनी जूनं ते सोनं हे दिवस आता आले आहेत. पहिल्यांदा नाईलाज म्हणून खाल्ली जाणारी नाचणी श्रीमतांच खाद्य बनलं आहे. गाईचे दूध हे मानवी जीवनात महत्व मानलं जातं. गोमुत्र,शेण यापासून बनविलेली दिव्य औषधीव्दारे कॅन्सरसारख्या रोगावरही नियंत्रण होत आहे. त्याअनुशंगाने आजचा विद्यापीठ, विवेकानंद रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टीटयुट लोटे आणि कामधेनू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षणाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
डाॅ. श्रीमती इंदू सावंत यांनी पर्यावरणपूरक जिवनशैलीची गरज विषद केली. या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक असलेले व्हीआयआरसीचे मुख्य प्रवर्तक सुरेश पाटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये ३५ गांडुळखताचे बेडची मागणी शेतकऱ्यांमार्फत झाली. व्हीआयआरटीव्दारे सवलतीच्या म्हणजेच रु ५००/- मध्ये ते पुरविले जाणार आहेत.
कार्यक्रमासाठी विवेक शेंडये, टेटवली गाव अध्यक्ष सिताराम गोरिवले, अप्पा आयरे, श्रीराम इदाते, अजय यादवराव, डाॅ. नरेंद्र प्रसादे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. संतोष वरवडेकर यांनी केले. प्रस्ताविक विवेक इदाते यांनी केले. कार्यक्रमात डाॅ. नरेंद्र प्रसादे यांनी गोसवंर्धन व गांडुळखत, संदेश गिम्हवणेकर यांनी प्रात्यक्षिकासह गांडुळखत, मूरघास, अझोला याची माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी, चिपळूण, खेड, गुहागर, मंुबई, ठाणे तसेच स्थानिक ७६ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक, डाॅ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. संतोष वरवडेकर, संतोष बुरटे, समीर झगडे, अमोल म्हसकर, राजेश दिवेकर तसेच कामधेनू गोशाळेच्या सर्व सदस्यांनी विषेश मेहनत घेतली.