राजकारण दोन विभागात दुभंगलेले असते. मैदानी आणि दरबारी. तसे प्रत्येक क्षेत्र या प्रवृत्तीने ग्रस्त असते. माणसं काही एका उद्देशाने एकत्र येणं हेच मूळ राजकारण असतं ज्यात समाजकारण सुद्धा येतंच. लोकशाहीचं हे सौंदर्य आहे.
शिवसेना आणि मुंबई, ठाणे, कल्याण, कोकण, महाराष्ट्र असा एक प्रवास आहे. त्यात औरंगाबादचा संभाजीनगर नामकरण, नामांतर चळवळ, उस्मानाबाद धाराशिव राजकारण आणि एकूण मराठवाडा, विदर्भ अमरावती वऱ्हाड पट्टा ,पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हे मोठे टप्पे आहेत.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासून सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मोठी परंपरा शिवसेनेच्या स्थापने मागे खंबीर होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा कल्याण भिवंडी, मुंबई दंगली पर्यंतचा हिंदुहृदयसम्राट सम्राट चा प्रवास लक्षात घेण्यासारखा.
1966 ते 1990 ही शिवसेने ची तब्बल 24 वर्षे हा टप्पा आजच्या शिवसेनेचा खरा पाया आहे. ती पिढी आता अस्तंगत होत चालली आहे.
या काळात महाराष्ट्र स्थापने नंतर मुंबई ही देशाची आजच्या प्रमाणेच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती, राज्यातील सुशिक्षित आणि बेकारांचे तांडे आणि स्थलांतरीत मराठी ( त्यात मुस्लिम, ख्रिस्ताव सुद्धा) हे शिवसेनेचे मुख्य सामायिक भागीदार होते.
नोकरी, मिल मजदूरी या भोवतीच तयार झालेल्या “परप्रांतीय” गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीयांच्या मोनोपोली विरोधातला हा मराठी माणसांचा उद्गार होता, प्रक्षोभ होता. शिवसेनेने दक्षिण भारतीयांना धारेवर धरणे, कम्युनिस्टांचा विरोध करणे, काँग्रेस सोबत सलगी आणि रसद घेणे, वरळीत दंगे करणे, पँथर सोबत दावा बोलणे, ढसाळांच्या सोबत आणि हाजी मस्तान सोबत दोस्ती करणे, गुंडांना वडापाव ते झोपडपट्टी दादा पासून नगरसेवक बनवण्याच्या प्रक्रियेत आणणे, मटका किंग ना आधार देणे, आणि सुशिक्षित शहरी तरुणांना स्थानिय लोकाधिकार बजावण्यासाठी संघर्ष करून, पेटवून एक “मार्मिक” वैचारिक बैठक देणे या महत्वाच्या बाबी होत्या.
त्या अर्थाने शिवसेना ही मराठी शहरी बहुजन, ओबीसी, ब्राह्मण, सगळ्यांना आधार देणारी संघटना ठरली.
उर्वरित राज्यातील मराठा हा संपूर्णपणे काँग्रेस सत्तेच्या मांडवाखालीच होता तर दलित पँथर चळवळ ही भरात होती. मराठी मनाचा मानबिंदू हा शिवसेनेचा प्रवास अधिक तपशिलात अभ्यासकांनी समजून घ्यायला हवा, कारण चळवळ ते संघटना आणि राजकीय पक्ष असा शिवसेनेचा पाया होता. जवळजवळ 19 वर्षे. यात अगदी आणीबाणी आणि बाळासाहेबांचा पाठिंबा इंदिरा गांधी यांना देणं, हे सगळं वास्तव होतं.
तोडफोड ,राजकीय हत्या, गुंडगिरी ही पार्श्वभूमी होती, जी तत्कालीन सुशिक्षित समाजाला योग्यच वाटत होती.
1980 च्या दशक उत्तरार्धात शिवसेना, “मंडल” च्या वादळात कमंडल कडे झुकू लागली, भगवा होऊ लागली. 1990 च्या मंडल आयोग ओबीसी आरक्षण आगडोंबात, विलेपार्ले येथील 1987 च्या डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीत ,बाळासाहेब ठाकरे यांनी खारदांडा इथे शंकर मंदीर परिसरात केलेलं भाषण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गाजलं आणि न्यायालयाने त्यांना गुन्हेगार ठरवलं.
देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या मुद्द्याचा शिवसेनेने अंगीकार केला आणि बाबरी 1992 ते मुंबई दंगल 1993 या वर्षात बाळ केशव ठाकरे या व्यंगचित्रकाराचा ,हिंदुहृदयसम्राट झाला. भाजप सोबत आला, 1995 चं युती सरकार आलं तेव्हा नगण्य अश्या भाजप ला बरोबरीने स्थान सन्मान दिला गेला. बाळासाहेब ठाकरे हा एक संप्रदाय झाला.
पुढील काळात बाळासाहेबांच्या उतार वयात सुरू झालेला राज की उद्धव हा मोठा शिवसेना सत्तांतर काळ होता, उद्धव यांनी केवळ बाजी नाही मारली तर सगळे नियम बदलले, शिवसेना मी मुंबईकर झाली, परप्रांतीय उत्तर भारतीय शिवसेनेची वोट बँक होऊ लागली, मुंबई महापालिका नुसती जिंकली नाही तर जम बसवला, पुढे भाजप सोबत फारकत घेऊन थेट महाविकास आघाडी केली.
ज्या कर्मकांडी विरोधी प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुलाने हिंदुहृदयसम्राट होऊन प्रखर हिंदुत्व,गर्व से कहो हम हिंदू हैं केलं, अल्पसंख्य ब्राह्मण मुख्यमंत्री केला, त्या बाळासाहेबांच्या मुलाने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं, ठोकशाही रिमोट कंट्रोल ठाकरे आता खुद्द मुख्यमंत्री झाले आणि पुढची पिढी आदित्य आमदार झाले. पहिल्यांदा राज्याच्या लोकशाही प्रक्रियेत ठाकरे सामील झाले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात शरद पवार कारणीभूत ठरले.
शिवसेना पक्ष, शिवसैनिक आणि शिवसेना नेते या समीकरणात कुठेतरी याच वेळी भविष्यातील मोठ्या बंडखोरीची बीजे पेरली गेली. बाळासाहेब ठाकरे संप्रदाय कुठेतरी विस्कळीत व्हायची ही सुरुवात होती.
मातोश्री हे या बाळासाहेब संप्रदायाचं स्थान महात्म्य होतं. काही प्रमाणात ते आज आहेच म्हणूनच शिवसेनेमध्ये निर्णायक बंडखोरीचं चित्र आज समोर असताना, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे असल्याचं दिसत आहे.
शिवसेना हा त्या अर्थाने सतत बदलणारा चित्रपट आहे. बंडखोरीची परंपरा बंडू शिंगरे, डॉ. गुप्ते, ते श्रीधर खोपकर, छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि खुद्द राज ठाकरे अशी आहे.
असं असताना आज बंडखोरांना पोस्टरवर बाळासाहेब आणि आनंद दिघे आशीर्वाद देताना दिसत आहेत.”ठाकरे” आडनाव असलेल्या राज ना सुद्धा शिवसेनेचे आव्हान संपवता आले नाही त्याचे एकमेव कारण हे मातोश्री, बाळासाहेब यांच्या भोवती असलेल्या “भावनिक”ते मुळे हे बंडखोरी करणाऱ्यांना सुद्धा नक्की माहीत असेल, पण त्यांचाही नाईलाज आहे.
हे सुद्धा एका चित्रपटा सारखं रंजक आहे.
एका शिवसेनेत असे चित्रपटांचे शेकडो विषय आहेत. माझ्यासाठी शिवसेना ही नेटफ्लिक्स सिरीज सारखी आहे.
धर्मवीर अलीकडेच सगळ्यांनी पाहिला, कॉ. कृष्णा देसाई ना संपवणारी भगवा ब्रिगेड हा ही एक विषय होऊ शकेल, आमच्या कल्याण ठाणे, परिसरात तर एक एक जण म्हणजे चित्रपटाचे विषय. गॅंग वॉर असोत की राजकीय हत्यांचा विषय, भांडुप, लालबाग , माहीम, कल्याण, कणकवली, ठाणे स्टेशन, इथे घडलेली कित्येक रक्तरंजित प्रकरणं सुद्धा याच सत्ताकारणाचे भाग आहेत. शिवसेना समजायला मुंबई ठाण्याच्या परिसरात बराच काळ जावा लागतो. दादर, लालबाग, बांद्रा पहावा लागतो, शाखा प्रमुख, विभागप्रमुख यांची फुल टाईम कामं पहावी लागतात, शहरात फिरणाऱ्या ऍम्ब्युलन्स आणि त्यातील भावनिकता समजून घ्यावी लागते.
हा सगळा मुलुख शिवसेनेचा, बिल्डर आणि बांधकाम व्यवसाय, याच्या अवाढव्य काळ्या पांढऱ्या अर्थकारणावर उभा राहिला आहे.
विरार वसई,नवी मुंबई, कल्याण, ,डोंबिवली, भिवंडी, ठाणे, मुलुंड, भांडुप, चेंबूर हा भूभाग, इथला भूमाफिया, इथले कोळी आगरी बांधव त्यांच्या जमिनी हे एक अर्थकारण, शहरीकरणात फोफावत जातांना इथल्या राजकारणात, सुशिक्षित बाहेर फेकला गेला, रिक्षा आणि रेती, खंडणी आणि खून करणारे इथल्या राजकारणात स्थिरावले, याला सुद्धा शिवसेना आणि तत्कालीन काँग्रेसचे राजकारण जबाबदार आहे.
हे सगळं विस्ताराने लिहिण्याचं कारण हेच की, एका प्रादेशिक अस्मितेचा आवाज क्षीण होताना पाहत असतो त्यावेळी आपल्याला त्यातील अनेक कंगोरे समजवून घ्यावे लागतात.
भारतीय राष्ट्रीय पक्ष, महाराष्ट्र अस्मिता, आणि राजकीय भावनिकता यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी एकीकडे, जात वास्तव एकीकडे आणि आता पैसा सत्ता प्रशासन-अधिकार यांची सांगड असलेलं, दरबारी राजकारण एकीकडे अश्या जटील अवस्थेत आज शिवसेनेचा वाघ अस्तित्व टिकवू पाहतोय. या अस्तित्वाच्या लढ्यात या वाघाला आज आत्मपरीक्षण करायला सुद्धा अवधी नाही.
50 हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करणारी महापालिका संभाळणे, ते एखाद्या युरोपीय राज्याची अर्थ सत्ता संभाळणे, जे राज्य देशाचं ग्रोथ इंजिन आहे ते संभाळणे यामध्ये असलेला फरक ओळखणे, त्याची जाणीव असणे, त्यासाठी तशा यंत्रणा स्वतः सोबत ठेवणे, माहिती जमवून त्याचे पृथ:करण करणे, या ऐवजी काही बोटावर मोजता येणाऱ्या दरबारी मंडळी सोबत राज्यकारभार आणि शकट चालवणे हे किती अवघड आहे, याची जाणीव आज शिवसेना नेतृत्वाला झाली असेल.
राज्यातील ग्रामीण आमदार आणि शहरी आमदार यांच्या सोबत असलेला परस्पर भाव, त्यांना मिळत असलेली वागणूक आणि एकनाथ शिंदे यांच्या सारख्या पक्षातील एखाद्याच मैदानी नेत्यांवर असलेलं अवलंबित्व हे किती मुळावर येऊ शकतं याचा अनुभव एव्हाना आलाच असेल.
दर वेळी होणाऱ्या बंडखोरीमध्ये, काही मोजकी नावं इन, मिन, तीन येणं याबाबत असलेली संघटनात्मक जबाबदारी आणि अपयश हेही उद्धव ठाकरे यांना आता समजून चुकायला हरकत नाही.
सत्ता आल्यावर बदलणारे नेते सर्वच पक्षात असतात. सत्तेभोवती तेच तेच दलाल डल्ला मारायला फिरत असतात. माणसांची नाती, संबंध, सौहार्द ,पारदर्शकता, कला, क्रीडा, साहित्यिक, चळवळी यांच्या समुच्चयानं सर्वच राजकीय पक्ष उभे राहत असतात, नेते मोठे होत असतात, पण याचा विसर पडला की ही अतित्व हरवण्याची अवस्था अटळ होत असते.
आज सत्ता आणि पैसा इतकाच काय तो व्यवहार राजकारणात सर्व पक्षांत बोकाळला आहे. महाराष्ट्र याची किंमत मोजतो आहे. वैचारिक राजकारण ते विखारी राजकारण असा हा प्रवास आहे. देशात बलाढ्य भाजपच्या आक्रमक राजकारणात जसे पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तरप्रदेश ,बिहारमध्ये प्रादेशिक पक्ष एका मागे एक ढासळत चालले आहेत तिथे महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती नाही.
शिवसेना आज उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची “बाळासाहेब” शिवसेना हा प्रश्न इथले नागरिक ठरवतील, जेव्हा मतदान होईल. तो पर्यंत हा संघर्ष आता कायद्याच्या कचाट्यात लांबत जाईल.
सध्या तरी ही बंडखोरी, राजकीय पक्षाची अंतर्गत साठमारी, बलाढ्य भाजपची सातत्यपूर्ण आक्रमक योजना, केंद्रीय यंत्रणांचा भडिमार आणि शिवसेनेतील दरबारी लोकांनी मैदानी लोकांचा सातत्यपूर्ण अपमान, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विकासकामांचा गनिमी कावा आणि शिवसेना आमदारांच्या समोर उभे केलेले स्थानिक मतदारसंघातील आव्हान याचा परिपाक आहे.
सतत बदलत गेलेल्या शिवसेनापक्षाचा भावनिक संप्रदाय ते अर्थसत्तेतील परस्पर साठमारीने क्षीण होत गेलेला प्रादेशिक पक्ष असा हा प्रवास आहे.
~ मंदार फणसे