रत्नागिरी : रत्नागिरीचे राजकारणामधील एक महत्त्वाचा चेहरा आज हरपला आहे. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे कुमार शेट्ये यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णकाळ देखील पाहिला आहे. रत्नागिरी ते आमदार आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही त्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलं आहे.

कुमार शेट्ये यांचं आज (२७ डिसेंबर)  रोजी लोटलीकर हॉस्पिटलमध्ये उपचार  घेत असताना येथे  निधन झालं. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शरद पवार यांनी पत्र लिहून व्यक्त केला शोक

कुमार शेटे यांच्या बद्दल शरद पवार यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये ते असं म्हणतात की,  प्रकृतीची समस्या असताना देखील कुमार शेट्ये हे कायम सार्वजनिक कामाच्या निमित्ताने माझ्या संपर्कात असायचे. त्यांची ही जीवननिष्ठा माझ्या कायम स्मरणात राहील. कुमार शेट्ये यांच्यासारखा विनम्र, प्रामाणिक आणि निष्ठावंत सहकार्याचं जाणं ही माझ्यासाठी दुःखदायक बाब आहे.