रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कडक टाळेबंदी करण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. यासंदर्भात शुक्रवारी आढावा घेतला. त्यामुळे आठ दिवस टाळेबंदीबाबत पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांकडे ही बाब मांडणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनासंदर्भातील परिस्थितीबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण 66 टक्केवरुन 86.98 टक्केवर पोचले आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानकारक बाब आहे. सध्या 3 हजार 356 बाधित उपचाराखाली आहेत. मात्र मृत्यूदर 3.31 टक्के झाला आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. या परिस्थितीवर नियंतण करण्यासाठी कडक लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे सर्वच अधिकाऱ्यांनी सुचित केले आहे. हा पर्याय अवलंबण्याबाबत मंत्रीस्तरावर चर्चा केली जाईल. पालकमंत्री अॅड. परब यांच्याशी चर्चा करुन लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव सादर केला. जाईल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर रत्नागिरीतील व्यापारी वर्गाशी चर्चा केली जाईल. सर्वाना विश्वासात घेऊन त्यानंतर याची अंमलबजावणी केव्हा करायची यावर निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊनची घोषणा करण्यापुर्वी केंद्र शासनाच्या निकषानुसार नागरिकांना 48 तास आधी कळवण्यात येईल. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासन घेईल.

गृहविलगीकरण बंदचे आदेश आल्यामुळे घरीच उपचार घेत असलेल्यांना लवकरच कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाणार आहे. जागा अपुरी पडू नये यासाठी नवीन कोविड केअर सेंटर ग्रामपंचायतस्तरावर सुरु केली जातील. त्यासाठी जिल्हा परिषद नियोजन करत आहे. दोन हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावातील बाधितांची संख्या पाहून दहा बेडचे सेंटर सुरु केले जाईल. एकाच गावात पंधरा बाधित सापडले तर त्यांची घरीच व्यवस्था करणे शक्य होत नाही. त्यांची व्यवस्था सीसीसीत केल्यास त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाते आणि प्रादुर्भाव थांबवता येईल. होम आयसोलेशन दोन दिवसात बंद होणार आहे. कमी लोकसंख्येच्या गावातही तीन ते चार बेडस्ची छोटी सेंटर उभारण्यासाठी आवाहन केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे तीन हजार बेडरची व्यवस्था होईल. होम आयसोलेशन बंद केले तरीही बाधितांना कोठे ठेवणार हा प्रश्न सुटेल, असा विश्वास मंत्री सामंतांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोरोनातील परिस्थिती, दहावीच्या परिक्षा रद्द झाल्यामुळे किंवा अन्य कारणांनी अनेक मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले. काहींचे आधारकार्ड मुंबईचे असले तरीही त्यांचे मुळ रत्नागिरीतीलच आहे. ते गावी आल्यामुळे त्यांनी नोंदणी केली असेल तर त्यांनाही लस दिली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.