दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या सर्व आस्थापनेतील शिक्षक वर्गासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नुकतेच अर्बन सीनियर सायन्स कॉलेज येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयक मार्गदर्शन दापोली शिक्षण संस्थेचे माजी संचालक सौरभ बोडस यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात दापोली शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, संचालिका आर्या भागवत, अर्बन सिनियर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, मुख्याध्यापक एस. एम .कांबळे, उपमुख्याध्यापक डी.एम. खटावकर, महर्षी कर्वे शिक्षण संस्था मुरुडचे विश्वस्त विवेक भावे, सचिव विराज खोत यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
याप्रसंगी सोहनी विद्यामंदिरचे शिक्षक मुकेश बामणे यांनी संस्कृत भाषेत प्रार्थना सादर केली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक बोडस यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल पहिल्या सत्रात या धोरणाची सुरुवात कशी होत गेली? त्याचा आराखडा केंद्रीय स्तरावर कसा तयार करण्यात आला? याबद्दल विविध नेमलेल्या समित्यांविषयी माहिती दिली.
तसेच दुसऱ्या सत्रात राज्य शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा त्यानंतर येणारा पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके याची माहिती देऊन प्राथमिक स्तरावरील ते इयत्ता बारावी पर्यंत विषय निवड कशी असणार तसेच शिक्षक म्हणून शिक्षकाची भूमिका याविषयी कशी असणार याबद्दलची सविस्तर माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे दिली.
तसेच सत्रा शेवटी शिक्षकांना आलेल्या शंका समस्यांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मधुरा पाठक यांनी केले तर आभार मुकेश बामणे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी दापोली शिक्षण संस्थेच्या सर्व आस्थापनेतील 150 शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम महाजन, शंतनू कदम, मुकेश बामणे, मधुरा पाठक, जितेंद्र पाडळकर, अनिकेत नांदिस्कर यांनी विशेष प्रयत्न केले.