मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री आपल्या दिल्ली भेटीत विधिज्ञांशी चर्चा केली.

या चर्चेनंतर नार्वेकर हे पुढील आठवड्यात आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार येत्या आठवडयात सुनावणी घेऊ. गरज पडल्यास दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनाही बोलावू, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

निर्णय करण्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही किंवा घाईही करणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

संवैधानिक तरतुदीनुसारच निर्णय

आमदार अपात्रतेच्या बाबतीत मी सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याने अधिक बोलणे उचित ठरणार नाही. ही बाबी न्यायप्रविष्ठ आहे. संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिले आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही, परंतु तितकीच घाईही करणार नाही. सर्व नियम, कायदेशीर आणि संवैधानिक तरतुदी आहेत त्यांचे योग्यरित्या पालन करूनच मी निर्णय घेईन.

– राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष