रत्नागिरी : भारतीय असंतोषाचे जनक आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रखर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज १ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

येथील ऐतिहासिक टिळक आळीमधील टिळक स्मारकात सकाळी नऊ वाजता हा सोहळा पार पडला. याप्रसंगी टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे अतुलनीय योगदान आणि केसरी व मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी पेटवलेल्या वैचारिक क्रांतीचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

टिळकांनी पत्रकारितेतून केलेले जनजागृतीचे उत्तुंग कार्य आजही देशातील प्रत्येक पत्रकारासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

त्यांच्या निर्भीड, समाजोपयोगी आणि राष्ट्रहित जपणार्‍या पत्रकारितेचा वारसा पुढे चालवण्याचा तसेच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करण्याचा संकल्प याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी केला. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी शाखेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.