रत्नागिरी : राजिवडा आणि मांडवी खाडीमुखातील गाळ उपशाचे काम तातडीने सुरू करून सध्या सुरू असलेल्या ब्रेकवॉटरच्या कामाला गती द्यावी, या मागणीसाठी जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी आणि मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

राजिवडा आणि मांडवी खाडीमुखाशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ, वाळू व सॅण्ड बार साचत असल्यामुळे मच्छीमारांच्या होड्यांच्या सुरक्षित ये-जा करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे.

विशेषतः छोट्या मच्छीमारांना कमी पाण्याची खोली व गाळामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नौका अडकणे, नुकसान होणे तसेच जिविताला धोका निर्माण होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी तथा राजिवडा-फणसोप, भाट्ये, सोमेश्वर आणि करला परिसरातील मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीने गेल्या चार-पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

यासाठी वेळोवेळी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या पाठपुराव्यादरम्यान जनता दरबारामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर गाळाचा आणि बंधाऱ्याचा प्रश्न अनेकदा मांडण्यात आला होता.

त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला. तसेच खासदार नारायण राणे यांची भेट घेऊनही हा प्रश्न मांडण्यात आला होता. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकामी सहकार्य केल्याबद्दल समितीने त्यांचे आभार मानले आहेत.

सध्या भाट्ये येथे ब्रेकवॉटरचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आता राजिवडा खाडीतील गाळ उपशाचे कामही लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे.

ब्रेकवॉटर आणि गाळ उपसा ही दोन्ही कामे परस्परपूरक असल्याने मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात अनावश्यक विलंब होऊ नये, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

काही नागरिकांनी या प्रकल्पाबाबत तांत्रिक आणि पर्यावरणीय शंका उपस्थित केल्या असल्या, तरी त्या शंकांची कागदपत्रे व तांत्रिक अहवालाच्या आधारे तपासणी करावी, मात्र या कारणामुळे मच्छीमारांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला विलंब होऊ नये, असे समितीने स्पष्ट केले आहे.

यावेळी निवेदन देताना राजिवडा कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, कार्याध्यक्ष इम्रान सोलकर, सल्लागार शकील दावत, रहीम दलाल, लुकमान कोतवडेकर आदी उपस्थित होते.