रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये ‘मराठी भाषा क्लब’ची स्थापना करण्यात आली.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे, विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित करून त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित मराठी साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या क्लब स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चौधरी उपस्थित होते, तर कांदळवन प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक ऋषीकेश भाटकर हे विशेष अतिथी म्हणून लाभले होते.

यावेळी डॉ. चौधरी यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील उपयुक्तता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून भाषेच्या जतन, संवर्धन आणि दैनंदिन वापरासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

त्यानंतर कार्यालय अधीक्षक सचिन जाधव यांनीही मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी क्लबच्या संरचना आणि मार्गदर्शक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले तसेच पहिल्या सभेत कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.

या क्लबच्या माध्यमातून भविष्यात मराठी भाषा गौरव दिन, राजभाषा दिन, साहित्य वाचन, लेखन, वक्तृत्व, निबंध, कार्यशाळा आणि परिसंवाद असे विविध भाषिक व सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे राबविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय प्रभारी अधिकारी अभिजित पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष तथा सहाय्यक प्राध्यापक एन. बी. मिरजकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास उपस्थित प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मराठी भाषेच्या जतन आणि प्रभावी वापराचा संकल्प व्यक्त केला.