रत्नागिरी : समाजातील वाढत्या आत्महत्या आणि अपप्रवृत्ती टाळण्यासाठी वाचन व लेखन अत्यंत उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे आजच्या तरुणांनी समाजातील अस्वस्थता प्रकट करण्यासाठी लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे अंकलगे यांनी केले.
न्यू एज्युकेशन सोसायटीचे फाटक हायस्कूल, वि. स. गांगण कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि त्रि. प. केळकर सायन्स कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अंकलगे यांनी सांगितले की, वाङ्मय मंडळातून व्यक्त होण्याची आणि लिहिण्याची मोठी संधी मिळते आणि येथूनच साहित्यिक वाटचालीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
अनेक ज्येष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिक हे अशाच शालेय वाङ्मय मंडळातून घडल्याची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. तरुणांमधील आणि समाजातील अस्वस्थता दूर करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शिक्षक, पालक आणि व्यवस्थेने एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी मांडले.
या उद्घाटन सोहळ्याला न्यू एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुमिता भावे, कार्याध्यक्षा दाक्षायनी बोपर्डेकर, सचिव गोगटे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक जोशी, वाङ्मय मंडळाचे प्रमुख विजय गावडे आणि बापट उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला परिसरातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

