रत्नागिरी: ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत स्वातंत्र्य संग्रामात चैतन्य निर्माण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी येथील जन्मस्थळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी विनम्र अभिवादन केले.

जन्मस्थळाच्या आवारात असलेल्या लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. याच ठिकाणी असलेल्या ध्वजस्तंभावर त्यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हटले.

वास्तूच्या आत असलेल्या लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून तसेच अर्ध्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यानंतर मनुज जिंदल यांनी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि तेथील ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली.

याप्रसंगी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह पुरातत्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, त्यांनीही लोकमान्य टिळकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.