दापोली : शहरातील पोस्ट ऑफिस गल्लीसमोर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एकावर कोयत्याने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवारी (दि. ६ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली कदम (३८, व्यवसाय भाजी विक्री, रा. काळकाई कोंड नागरबुडी) व त्यांचा पती राकेश कदम हे दोघे दवाखान्यात जात होते.
तेव्हा त्यांच्या दुकानाची लोखंडी मांडणी प्रवीण शेठ याच्या सांगण्यावरून त्यांच्या कामगाराने उचलून बाजूला ठेवली होती.
याबाबत वृषाली कदम या शेठला विचारणा करण्याकरिता गेल्या. त्यावेळी प्रवीण शेठ यांनी वृषाली कदम व त्यांचा पती राकेश कदम यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली.
त्यावेळेला झालेल्या भांडणात राकेश कदम हे वृषाली कदम यांना वाचवण्याकरिता पुढे आले तेव्हा प्रवीण शेठ हा त्यांच्या अंगावर धावत गेला.
त्यांच्यात झालेल्या झटापटीत हातातील कोयतीने राकेश कदम यांना दुखापत झाली. दापोली पोलीस ठाण्यात प्रवीण शेठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस करीत आहेत.