आज माझ्या ज्येष्ठ नित्राचा ७० वा वाढदिवस आहे. हे मनाला पटणंच कठीण आहे कारण ज्या उत्साहाने जयवंतशेठ माणसांना भेटतात. माणसांची कामे करतात, प्रवास करतात, हे बघता जयवंतशेठ यांना ७० वर्ष झाली हे मनाला पटणे कठीण आहे.
१९८४ पासून म्हणजे गेली ४० वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र जाहोत आणि मैत्रीला कसे जागावे याचा वस्तुपाठ म्हणजे जयवंतशेठ आहेत, त्यांनी एकदा एखाद्या माणसाला मित्र मानले की ते अक्षरशः जिवाला जीव देतात. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी अडचण निर्माण झाली त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा वेळेवर धावून आले ते जयवंतशेठ.
फेब्रुवारी महिना आणि जयवंत शेठ यांचे एक वेगळेच नाते आहे, याच महिन्यात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, त्यांच्या एका मुलीचा वाढदिवस असतो, त्यांचा स्वतःचा वाढदिवस असतो आणि त्याचे सगळ्यात मोठे अपत्य म्हणजे दापोली अर्बन बॅंक या बँकेचा सुध्दा याच महिन्यात वर्धापन दिन असतो.
एकदा भारतातील सर्वांत मोठ्या को-ऑपरेटीव्ह बँकेचे चेअरमन दिवंगत एकनाथ ठाकुर हे दापोलीत आले होते. त्यांना मी विनंती केली आपण आमची दापोली अर्बन बँक बघून येवूया ते म्हणाले माझ्याकडे फत १० मिनिटं आहेत. त्यावेळात जेवढं जमेल तेवढं बघतो आणि ते मग बँकेत आले तब्बल अडीच तास रमले, त्यांनी सर्व बँकेतील कारभार समजून घेतला आणि बँकेतील उपस्थित कर्मचारी व संचालक मंडळाला मार्गदर्शन केले.
त्यावेळेला ते म्हणाले मी आतापर्यंत जगातल्या अनेक को-ऑपरेटीव्ह बँकेत जाऊन आलो माझी स्वतःची एक मोठी को-ऑपरेटीव्ह बँक आहे. पण बँकेच्या ग्राहकाला बसायला खूर्ची देणारी ही मी पहिलीच बँक बघितली आणि ज्या कोणी ही कल्पना काढली त्याला मी वंदन करतो. आणि ती कल्पना अर्थातच जयवंतशेठ यांचीच होती.
अशीच एक कल्पना जयवंत शेठ यांनी मांडली की बँकेच्या वाढीसाठी आणि बँकेत येणाऱ्या नवीन सभासदांसाठी काहीतरी करायला हवे त्याकरिता त्यांनी बँकेच्या सभासदांचा एक मेळावा घेतला आणि त्यामध्ये पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी अपेक्षित असलेला ज्ञान आणि प्रशिक्षण हे त्या त्या विषयातील तज्ञ आणून बँकेच्या खर्चाने सभासदांना दिले.
महिलांसाठी कमी व्याज दरात गॅस योजना ही पण कल्पना जयवंतशेठ यांचीच होती. संपूर्ण भारतात को-ऑपरेटीव्ह बँकेने एखादी फॅकल्टी काढली आहे. हे उदाहरण फक्त दापोली अर्बन सायन्स कॉलेजच्या निमित्ताने आपल्याला दिसू शकते.
ही सुध्दा कल्पना जयवंतशेठ यांचीच आहे. आज या अर्बन सायन्स कॉलेजमुळे दापोली शहरामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात तरुण मुलं मुली सायन्स या फॅकल्टीच्या पीएचडीपर्यंत लाभ घेत आहेत.
गेल्या ४० वर्षाच्या मैत्रीत असे कितीतरी क्षण आले त्यावेळेला आम्ही अनेक सुखदुःख वाटून घेतले आहेत, ज्या हिंमतीने आणि कतृत्वाने जयवतशेठ दापोली अर्बन बँकेचा कारभार हाकत असतात, त्याचप्रमाणे त्यांच्या मनामध्ये एक हळवा कोपरा सुध्दा आहे.
ते खुप कमी लोकांना माहित आहे. सिनेमा बघताना सुध्दा सिनेमातल्या एखाद्या पात्राच्या आयुष्यामध्ये काही अघटित घडल्यात जयवंतशेठ सिनेमा हॉलमध्ये रडू लागतात. आणि आपण स्तब्ध होतो.
जालगावकर कुटुंबिय आणि आमचे कुटुंब यांचे अनेक वर्षापासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. माझी आजी दिवंगत शैलाताई मंडलिक यांचे निधन झाल्यावर पहिला माझ्याकडे येऊन मला सांभाळणारा माणूस म्हणजे जयवंतशेठ.
२०१३ साली माझ्या सास-यांचा म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निघृण खून झाला त्यावेळेला स्वतःच्या सख्या बहिणीला भेटायला गेले असताना तिथे बातमी कळली म्हणून साताऱ्यापर्यंत लगोलाग येणारा माणूस म्हणजे जयवंतशेठ जालगावकर.
आमच्या मित्राच्या मैफैलित बसल्यावर गाणं म्हणणारा आणि वेगवेगळे विनोद सांगून सगळ्यांना हसवून मैफिलित जान आणणारा माणूस म्हणजे जयवंत शेठ.
जयवंतशेठ मध्ये आणखी एक स्वभाव वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ते खुप चांगले संग्रहक आहेत. त्याच्याकडे जुनी नाणी, जुन्या नोटा यांचा चांगला संग्रह आहे शिवाय टी टोटलर असणारे जयवंतशेठ हे मिनीएचर वाईन बॉटल्सचे संग्रहक आहेत.
त्यांच्याकडे जवळपास ८०० हून जास्त प्रकारच्या बाटल्यांचे कलेक्शन आहे. आतापर्यंत जगातल्या १८ ते २० देशामध्ये त्यांची भ्रमंती झाली असून त्या देशातली नाणी आणि नोटा त्यांच्या संग्रहात आहेत.
जयवंतशेठ बद्दल कदाचित लोकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे दरवर्षी गणपतीला त्यांच्या घरची आरास हे स्वतः जयवंतशेठ रात्रभर जागून करतात.
आदल्या दोन दिवसापर्यंत त्यांच्या मनात नक्की यावर्षी आरास कशाची करायची याबद्दल कळोल चालू असतो आणि गणपती यायच्या बरोबर एक दिवस आधी गणपतीच्या येण्याअगोदर त्यांच्या घरची आरास पूर्ण झालेली असते. दरवर्षी वेगळ्या प्रकारची आरास हे त्यांच्या गणपतीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्राचे लाडके नेते दिवंगत आर. आर आबा पाटील हे महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री असताना डॉ. मंडलिक ट्रस्ट तर्फे आम्ही महाराष्ट्रामध्ये हिशोब द्या अभियान राबविले होते.
म्हणजे जी ग्रामपंचायत त्यांचा हिशोब हा जनतेसाठी खुला करेल त्यांचा आम्ही सत्कार करू हे जाहीर केल्यावर सर्वात पहिल्यांदा जयवंतशेठ जालगांवकर यांनी टाळसुरे ग्रामपंचायतीचा हिशोब लोकांसाठी खुला करतो असे सांगितले आणि आर. आर. आबांच्या हस्ते टाळसुरे ग्रामपंचायतीमध्येच आर. आर. आबांना आणून आम्ही त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त टाळसुरे ग्रामपंचायतीने हिशोब द्या अभियान याचे पारितोषिक पटकावले होते.
याच वर्षात त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाली तसेच त्यांच्या आज ७० वा वाढदिवस आहे. ते अधिक जोमाने आणि निष्ठेने त्यांच्या आयुष्याचे शतक पूर्ण करतील याच्यात शंका नाही. माझ्या ज्येष्ठ मित्राला म्हणजे फ्रेंड, फिलॉसोफर, गाईड याला मानाचा मुजरा!
– अनीश पटवर्धन, दापोली