रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! राजेश टोपेंनी केली घोषणा!

राज्यात करोनाचं थैमान सुरू असताना सगळ्यांनीच डॉक्टरांना करोना योद्ध्यांचा मान दिला आहे. मात्र, अजूनही काही रुग्णालयांकडून रुग्णांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील अशा रुग्णालयांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये पुण्यातील रुग्णालयांकडून करोना उपचारांसाठी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलाचं ऑडिटरमार्फत ऑडिट केलं जाईल, असं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. आत्तापर्यंत फक्त दीड लाख रुपयांच्या वरच्या बिलांचंच ऑडिट केलं जात होतं. मात्र, आता प्रत्येक बिलाचं ऑडिट केलं जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. पुण्यातील करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

रुग्णालयांची पळवाट!

याआधी देखील अशा प्रकारे रुग्णालयांकडून अवाच्या सव्वा बिलं आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार दीड लाखांच्या वरच्या बिलांचं ऑडिटरमार्फत ऑडिट करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील काही रुग्णालयं त्यातून पळवाट काढताना दिसून आली. यामध्ये दीड लाखांच्या वरची रक्कम असेल, तर ती दीड-दीड लाखांच्या स्वतंत्र बिलांमधून वसूल केली जात होती. त्याला आळा बसावा, यासाठी आता प्रत्येक बिलाचं ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑडिटर असणं आवश्यक करण्यात आलं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

म्युकरमायकोसिस उपचारांविषयीही महत्त्वपूर्ण घोषणा!

दरम्यान, यावेळी पुण्यात म्युकरमायकोसिसचे उपचार देणाऱ्या रुग्णालयांसंदर्भात देखील राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पुण्यातील रुबी, जहांगीरसारख्या रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे उपचार दिले जातात. मात्र, ही रुग्णालये सरकारच्या यादीमध्ये समाविष्ट नसल्यामुळे तिथल्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या रुग्णालयांचा देखील सरकारी यादीमध्ये समावेश करण्यासंदर्भात पावले उचलण्यात आल्याची माहिती टोपेंनी यावेळी दिली.

पुण्यात होम आयसोलेशन कमी करणार!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने करोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करून संस्थात्मक विलगीकरणच करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यानुसार पुण्यातील होम आयसोलेशन हळूहळू कमी करणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. “पुण्यात ८० टक्क्यांपर्यंत होम आयसोलेशनच्या केसेस होत्या, त्या आता ५६ टक्क्यांपर्यंत आल्या आहेत. त्या केसेस आता २५-३० टक्क्यांपर्यंत आणणे म्हणजे होम आयसोलेशन कमी करून संस्थात्मक विलगीकरण जास्त व्हायला हवं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गरज लागल्यास नवीन कोविड केअर सेंटर्स उभारून तिथे सर्व आरोग्यव्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे”, असं त्यांनी नमूद केलं.

करोना ट्रॅकिंग-ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीनेच!

महाराष्ट्रात करोना रुग्णांचं ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं देखील राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केलं. “संपूर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीनेच करायला हवं असं सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलं आहे. आपण चौकात उभं राहून लोकांच्या चाचण्या करणं आणि त्यातून पॉझिटिव्हिटी रेट कमी करत आणणं हे आपल्याला करायचं नाहीये. हाय रिस्क आणि लो रिस्कमध्येच चाचण्या व्हायला हव्यात. चाचण्यांची संख्या अजिबात कमी होता कामा नये. पुणे चाचण्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, ते पहिल्याच क्रमांकावर राहिलं पाहिजे”, असं ते म्हणाले. “संस्थात्मक विलगीकरण केल्यामुळे रुग्णाची ऑक्सिजनची पातळी आणि इतर निरीक्षणं रोज केली जातील. त्यासोबतच यामुळे विषाणूचा फैलाव कमी होईल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा चालू राहणार!

वाढती रुग्णसंख्या पाहाता पुण्यात राज्य सरकारच्या निर्बंधांव्यतिरिक्त शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आज घेतलेल्या निर्णयानुसार शनिवार-रविवार पुण्यातील अत्यावश्यक सेवांवर असणारे निर्बंध उठवण्यात आल्याचं देखील राजेश टोप यांनी सांगितलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*