स्वामी विवेकानंदांसारखं चारित्र्य जपल्यानं डॉ. बुरोंडकर यशस्वी – डॉ. संजय भावे

दापोली : भारतीय संस्कृतीमध्ये माणसे पेहरावाने नव्हे तर चारित्र्याने नावारूपास येतात, हे स्वामी विवेकानंदांचे अनुभवी बोल डॉ. मुराद बुरोंडकर यांनी कृतीत उतरविल्याने ते जीवनात यशस्वी ठरले, असे गौरवोद्गार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी येथे काढले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ व कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बुरोंडकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्यांना त्यांच्या विभागातर्फे विभागाच्याच प्रक्षेत्रावर एका शानदार कार्यक्रमात भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे शुभेच्छा देताना

व्यासपीठावर डॉ.बुरोंडकर यांच्या सुविद्य पत्नी मैमुना बुरोंडकर, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र,कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस.बी. भगत, भात विशेषज्ञ डॉ. आर. एल. कुणकेरकर उपस्थित होते.

डॉ. भावे पुढे म्हणाले की, डॉ. बुरोंडकर यांच्याकडे सर्वकाही करूनही श्रेय दुसऱ्याला देण्याचा दत्तात्रयासारखा गुण होता, पण नेतृत्वासाठी लागणारा जनदग्नीचा गुण असता तर बरेच पुढे गेले असते. ते फारच लाजाळू व अत्यंत सावध वृत्तीचे आहेत.

विद्यापीठाच्या भल्यासाठी काम करताना माझ्यासारखं अगदी बिनधास्तपणे ‘जे होईल ते बघून घेऊ’ अशा आत्मविश्वासाने निळकंठाच्या भूमिकेतून काम करण्याची गरज असते. आम्ही एकत्र असताना त्यांना अनेक बक्षीसं व पुरस्कार मिळायचे, मला मिळायचे नाही त्याबद्दल त्यांचा हेवा वाटणे साहजिकच होते. पण माझा सोबती पुढे जात असल्याचा अभिमान व आनंद अवर्णनीय असायचा, असे ते म्हणाले.
हल्ली लोकांच्या वागण्यात, बोलण्यात कमालीचा स्वार्थ दडलेला आढळतो यावर अचूक भाष्य करताना ते म्हणाले की, माणसात व्यवहारिकता असावी, व्यावसायिकता नाही.

जीवनात चांगली माणसे मिळणे, ही आपली योग्यता असते, तर ती माणसे टिकवून ठेवणे, ही गुणवत्ता असते. एकमेकांसारखं न जगता एकमेकांसाठी जगणं आवश्यक असून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे आहे.

वय थकवू शकत नाही, ठेचा पाडू शकत नाही, जिंकण्याची जिद्द असेल तर परिस्थिती हरवू शकत नाही, या आशयाचा शेर ऐकवून त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या डॉ. बुरोंडकर यांचे मनोबल वाढविले असता, टाळयांचा कडकडाट झाला.

विविध वक्त्यांनी आपापल्या मनोगतात उघड केलेल्या विद्यापीठातील काही अंतर्गत बाबी अर्धसत्य असून, सत्यामागचं सत्य मी सेवानिवृत्तीच्या वेळेस सांगेन, असे
त्यांनी जाहीर करताच सभागृहात पुन्हा हास्याचा कलेलोट झाला.

डॉ. बुरोंडकर यांनी आपला जीवनप्रवास धीरगंभीर मुद्रेने उलगडून दाखविला. शास्त्रज्ञांनी शासनाचा पगार घेऊन मिळविलेल्या कौशल्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सेवेत रूजू झाल्यापासून सर्वच कुलगुरू महोदयांनी अपार प्रेम दिल्याचे, अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याचे नमूद करीत ज्येष्ठ, कनिष्ठ सहकारी व विद्यार्थ्याबद्दल त्यानी कृतज्ञता व्यक्त केली. कष्टाला पर्याय नसल्याचा सल्ला देत शेवटच्या श्वासापर्यंत विद्यापीठाच्या हितासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

याप्रसंगी डॉ. सुचित्रा देसाई, डॉ. भरत वाघमोडे, डॉ.विनायक जालगावकर, डॉ. अरूण माने, डॉ.संतोष सावर्डेकर, सौ. मिनाक्षी केळुसकर, डॉ.विजय दळवी, डॉ. रमेश कुणकेरकर, डॉ. शिवराम भगत, डॉ मनीष कस्तुरे आणि सौ. फातिमा बुरोंडकर यांची समयोचित भाषणे झालीत.

यावेळी कृषि वनस्पतीशास्त्र विभाग व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सहकारी पतसंस्थेतर्फे डॉ भावे यांनी डॉ. बुरोंडकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार केला. सौ. मैनुना बुरोंडकर यांचा सत्कार डॉ. सुचित्रा देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहयोगी प्राध्यापक डॉ. उदय पेठे यांनी केले, आभार विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी मानले.

यावेळी नवीद बुरोंडकर, हसनमिया ऐनरकर व बुरोंडकर कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महेंद्र पालशेतकर, डॉ. संदीप महाडिक, प्रा. भीमराव थवरे, कृषी सहाय्यक सुरेन्द्र कदम व राजेद्र पवार, बालाजी थोरात, शिल्पा जोशी तसेच पीएच.डी. व एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.