मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत हे शिबिर पार पडणार असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली याची रचना करण्यात आली आहे.
या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्व प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिरात काँग्रेस पक्षाची आगामी काळातील दृष्टी आणि दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
तसेच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही या संवादात प्राधान्य दिले जाणार आहे.
या शिबिरात राज्य आणि देशपातळीवरील विविध क्षेत्रांतील मान्यवर अभ्यासक आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत.
याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेते प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतील, तर सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील एआयसीसी प्रशिक्षण टीम या संपूर्ण प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहे.
‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या व्यापक दृष्टिकोनातून आखण्यात आलेल्या या शिबिरामध्ये बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्यावर भर दिला जाईल.
यातून जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वक्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तसेच दैनंदिन प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षणार्थी दररोज श्रमदानात सहभागी होतील आणि ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्यासाठी त्यांना मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाईल.
याद्वारे श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांची थेट जाणीव करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रदेश काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

