दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विविध गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दापोली तालुक्याच्या वतीने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत भाजपच्या तालुकाध्यक्ष जया अजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
दापोली येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाबाबत अधिक माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली शहर तालुकाध्यक्ष जया साळवी, दापोली ग्रामीणचे तालुकाध्यक्ष सचिन होडबे आणि संदीप केळकर उपस्थित होते.
या निवेदनात दापोली-मंडणगड तालुक्यातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, दापोली तालुक्यातील गाडीतळ येथील सध्या बंद असलेल्या तालुका स्कूलच्या जागेवर राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
दापोली तालुक्याला ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दापोली शहरासह तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने नागरिक व पर्यटकांची वर्दळ असते. मात्र सध्या दापोली-खेड तसेच दापोली-मंडणगड मार्गांची अत्यंत दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणातील खड्डे आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या चिखलामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आगामी गणपती उत्सवापूर्वी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रमुख प्रश्नांसोबतच रायगडला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा प्रश्न, दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनासाठी उपलब्ध होणारा निधी, मंडणगड शिरगाव एमआयडीसीतील जमीन अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांना मिळणारा योग्य मोबदला आणि दापोली शहरातील नवीन चिकन व मटण मार्केट इमारतीचे रखडलेले काम अशा विविध मागण्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, अन्यथा १५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे दापोली मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

